सांगली : महापालिकेच्या ऑनलाईन सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याची टीका होत आहे. या आरोपामुळे महापालिका व नगरसेवकांची बदनामी होते. त्यामुळे ऑनलाईन सभा तहकूब करून ऑफलाईन सभा घ्यावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी केली. त्यानुसार महापौर गीता सुतार यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करून २३ डिसेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे आदेश दिले.
या कालावधित शासनाकडून ऑफलाईन सभेचा आदेश न आल्यास ऑनलाईन सभाच होईल, असेही स्पष्ट केले. कोरोनामुळे शासनाने महापालिकेला ऑनलाईन महासभा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन सभा ऑनलाईन झाल्या.
या सभेत उपसूचनेव्दारे बंद जकात नाके भाडयाने देणे, भूखंडावरील आरक्षणे उठवण्याचा विषय घुसडण्यात आले होते. या भानगडीविरोधात कृती समितीने आंदोलनही छेडले. ऑनलाईनमुळे सत्ताधाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले.गुरुवारी महासभा सुरू होताच विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, वहिदा नायकवडी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विष्णू माने यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करण्याची मागणी केली. संतोष पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला ऑफलाईन सभा घेण्याचे पत्र शासनाने दिले आहे.
महापालिकेलाही ते लवकरच मिळेल. त्यामुळे ही तहकूब करण्याची मागणी केली. भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी ऑनलाईन सभेत भानगडी होत असल्याचा आरोप फेटाळला. आम्हीही ऑफलाईन सभा घेण्यास तयार आहे. याबाबतचा निर्णय महापौरांनी घ्यावा, असे स्पष्ट केले.. स्वाती शिंदे, गजानन मगदूम यांनी मात्र ऑनलाईन सभा तहकूब करू नये, अशी भूमिका घेतली. महापौर सुतार यांनी ऑनलाईन सभा तहकूब करून पुन्हा २३ डिसेंबर रोजी सभा होईल, असे सांगितले.आघाडीने पत्र आणावेराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांनी नेत्यांकडे पाठपुरावा करून ऑफलाईन सभेबाबत आदेश आणावेत. शासनाने आदेश दिल्यास सभा सभागृहात घेण्यात येईल, असे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी सांगितले.सभेत अडथळेऑनलाईन सभेत अनेक तांत्रिक अडथळे येत होते. काही सदस्यांना बोललेले ऐकू जात नव्हते, तर काहींचे बोलणे ऐकू येत नव्हते. रेंजची समस्या येऊ लागल्याने शेखर इनामदार यांनी तर विनायक सिंहासनेंच्या मोबाईलवरून सभेत हजेरी लावली होती.