सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ होत आहे. आॅनलाईन अर्ज सादर होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धांदल उडणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. महापालिकेच्यावतीने अर्ज भरून घेण्यासाठी तीन शहरांत पाच कार्यालये सज्ज ठेवली आहेत, तर पक्षीय पातळीवर उमेदवारांचे अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. ११ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येत्या १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे. ११ जुलैस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरले जाणार असल्याने इच्छुकांची धांदल उडणार आहे.या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप या चार प्रमुख पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही झाला आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा पक्षीय पातळीवर पोहोचली आहे, तर शिवसेना व भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. सुधार समिती व आप यांची युती पहिल्यांदाच नशीब अजमावत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांकडे ११०० इच्छुक आहेत.महापालिका प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी पाच विभागीय निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयात एक निवडणूक निर्णय अधिकारी व त्याच्या अखत्यारीखाली एक सहायक अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सांगलीत प्रभाग समिती एक (मुख्यालय), प्रभाग समिती दोन (शाळा क्रमांक एकजवळ), आरसीएच कार्यालय (काळ्या खणीजवळ) अशी तीन कार्यालये स्थापन केली आहेत. कुपवाडला एकच कार्यालय असून ते प्रभाग समिती तीनमध्ये आहे, तर मिरजेला दोन कार्यालये आहेत. त्यांच्या जागा मंगळवारी सायंकाळपर्यंत निश्चित करण्याचे काम सुरू होते.प्रशासन सज्ज, मात्र त्रुटी कायममहापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार, सायबर कॅफे चालक यांना आॅनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तरीही काही त्रुटी आहेत. मिरजेत अर्ज भरण्यासाठी बालगंधर्व नाट्यगृह व मिरज पंचायत समिती अशी दोन कार्यालये निश्चित केली होती; पण तेथे गैरसोयी अधिक असल्याने मंगळवारी दिवसभर नव्या जागेचा शोध सुरू होता.
सांगली महापालिकेची आजपासून रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:46 PM