सांगली - शहरात महापूर ओसरून दीड महिन्याचा कालावधी झाला तरी, महापालिका अद्याप या धक्क्यातून सावरलेली नाही. महापालिकेचा लेखा विभाग अजूनही भिजलेली कागदपत्रे वाळवण्यासाठी धडपडत आहे. लेखा विभागासह सामान्य प्रशासन, पंतप्रधान आवास कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची दुर्दशा अद्यापही संपलेली नाही.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगली शहराला महापुराचा मोठा धक्का बसला. पुराचे पाणी महापालिका मुख्यालयातही शिरले होते. तब्बल सात आठ फूट पाणी महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर होते. या मजल्यावर लेखा विभाग, सामान्य प्रशासन, स्थायी समितीचे सभागृह, समाजकल्याण कार्यालय अशा विविध विभागांचे कामकाज चालते. पुराचे पाणी महापालिकेच्या दारात येण्यापूर्वीच आयुक्त नितीन कापडणीस, महापौर संगीता खोत यांनी सर्वच विभागाला कागदपत्रे हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण लेखा विभाग सामान्य प्रशासन विभागाने यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे महापालिकेची जुनी बिले, चेकबुक, बँक पासबुक आदींसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून गेली. खुर्च्या, टेबल, कपाट आदींसह फर्निचर खराब झाले.
पूर ओसरून दीड महिना झाला तरी, ही सर्वोच्च कार्यालय अजूनही पूरग्रस्त बनले आहे. सध्या या कार्यालयातील फर्निचर मोकळे टाकले आहे. लेखा विभागात बँक पासबुक, चेकबुक व इतर कागदपत्रे एलईडी लॅम्पचा साह्याने वाळविण्याचा प्रयत्न सुरू आहे; तर काही कागदपत्रे, फायली पंख्याच्या वाºयाखाली वाळविली जात आहेत. लेखा विभागातील लोखंडी तिजोरीमधील फायली अद्याप बाहेर काढलेल्या नाहीत. तिजोरीतून अजूनही पाणी टपकत आहे. त्यामुळे या कार्यालयात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. ही अवस्था सामान्य प्रशासन व समाजकल्याण कार्यालयाची आहे. समाजकल्याण विभागाची ही कागदपत्रे भिजली आहेत. ही सर्व कागदपत्रे तीन, चार पंखे लावून वाळवली जात आहेत. स्थायी समिती सभागृहाचेही पुरात मोठे नुकसान झाले. या सभागृहातील संपूर्ण फर्निचर खराब झाले आहे. अद्यापही त्याच्या नूतनीकरणाबाबत कोणत्याच हालचाली झालेल्या नाही. आचारसहिंता संपल्यानंतर स्थायी समितीची सभा कोठे होणार, हा प्रश्न नाही.