सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने मंगळवारी प्रशासनाने ताब्यात घेतली. निवडणुक निकालापर्यंत सभा, विकासकामांनाही मनाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.कापडनीस म्हणाले, येत्या १ डिसेंबररोजी होणार्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. सर्वच निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीला मतदारांवर प्रभाव होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व सभांमध्ये होणार्या निर्णयांचा परिणाम होऊ नये यासाठी सर्व सभा, बैठकांना मनाई आहे.
पदाधिकार्यांची वाहने जमा केली आहेत. त्यांच्या कार्यालयातील नेत्यांची छायाचित्रे, चिन्हे झाकून ठेवण्यात येणार आहेत. कार्यालयांचा राजकीय चर्चा, बैठकांसाठी वापर होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.ते म्हणाले, नव्याने सुरू होणार्या कामांचे मुहूर्त, किंवा निर्णय होणार नाहीत. परंतु पूर्वी सुरू असलेल्या योजनांची कामे सुरू रातहील. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य विकासकामे बंद राहतील. शहरात राजकीय पक्षांची डिजिटल पोस्टर्स हटविण्यात येतील.