सांगली : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानातंर्गत महापालिकेच्यावतीने शहिदांच्या कुटूंबियासह स्वातंत्र्यसैनिकाचा सत्कार करण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होईल. याशिवाय वृक्षारोपण, हर घर तिरंगा यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुनिल पवार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
पवार म्हणाले की, अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्यासह सर्वच शाळांत पंचप्रण शपथ देण्यात आली. सफाई कर्मचार्यांसह ७७ ठिकाणी पंचप्राण शपथ कार्यक्रम झाला. तीनही शहरात अमृतवाटिका तयार करण्यात येणार असून यात देशी प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. या निमित्ताने दहा हजार झाडे लावण्याचा मानस आहे. त्यात बेडग कचरा डेपोवर साडेतीन हजार झाडे लावली जातील.
महापालिका क्षेत्रातील शहिदांच्या कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होईल. आजारी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जावून सत्कार केला जाईल. १४ ऑगसस्ट रोजी तीन ठिकाणी शिलाफलक लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित राहणार आहेत. हर घर तिरंगा ’ अभियानासाठी पोष्टामार्फत ध्वज विकत मिळतील. सामाजिक संस्था, राजकीय नेत्यांनी नागरिकांना ध्वज द्यावेत, असे आवाहनही पवार यांनी केले.