सांगली : महापालिकेचे बंद जकात नाके नाममात्र भाडेपट्टीने देण्याचा घाट घातला गेला होता. ऑनलाईन महासभेत उपसूचनांद्वारे जकात नाक्यांचा बाजार सुरू होता. अखेर या उपसूचना रद्द करण्याचा निर्णय गुरूवारच्या सभेत घेण्यात आला.
आता महापालिकेच्या जागा ई लिलाव पद्धतीनेच भाड्याने देण्याचे आदेश महापौर गीता सुतार यांनी दिले. महापालिकेच्या गत ऑनलाईन सभेत बंद असलेले जकात नाके भाडेपट्टीने देण्याचा ठराव घुसडण्यात आला होता. या ठरावाची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही माहिती नव्हती.माधवनगर व कोल्हापूर रोडवरील जकात नाक्याची जागा नाममात्र भाडेपट्टीने देण्याचा घाट घातला होता. नगरसेवकांनी उपसूचनांद्वारे हा कारभार केला होता. ह्यलोकमतह्णने या कारभारावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्याची दखल घेत, ई लिलाव पद्धतीनेच जागा भाडेपट्टीने देण्यात याव्यात, अशी सूचना मालमत्ता विभागाला दिली होती. तसेच महापौर सुतार यांनी आयुक्तांना ई लिलाव पद्धतीचा वापर करण्यासाठी पत्र दिले होते.
गुरुवारच्या सभेत महापौर सुतार यांनी या उपसूचना रद्द केल्या. त्यामुळे जकात नाक्यांच्या जागा नाममात्र भाडेपट्टीने लाटण्याचा डाव उधळला गेला. आता सर्वच जागा ई-लिलाव पद्धतीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला.जकात नाक्यांसोबतच मिरजेतील अण्णाबुवा कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांना वाढीव जागा देण्याचा ठरावही रद्द करण्यात आला. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी हा प्रस्ताव दिला होता. महापौर गीता सुतार यांनी, यापुढे चुकीचे विषय आणून महापालिकेचे नुकसान करू नये, असा सज्जड दमही प्रशासनाला भरला.कर्मचार्यांचा आरोग्य विमा का नाही?कर्करोगाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याच्या विषयाला सभेत मान्यता देण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी, महासभेत सर्व कर्मचार्यांचा आरोग्य विमा काढण्याचा निर्णय झाला होता, त्याचे काय झाले? असा सवाल केला. यावर उपायुक्त राहुल रोकडे यांनी, प्रशासन सामुदायिक विम्याची लवकरच पूर्तता करीत असल्याची ग्वाही दिली.