सांगली : कोरोनाबाधितांची घटती संख्या पाहता, महापालिकेने आदिसागर कोविड सेंटर बुधवारपासून बंद करण्यात आले. तशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या कोविड सेंटरमधून आजअखेर ६४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा रुग्णालय सुरू करण्यात येईल, असेही कापडणीस यांनी स्पष्ट केले.आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. रुग्णांना बेड मिळत नव्हते. आॅक्सिजनची व्यवस्था नव्हती. अशा संकटाच्या काळात आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्यावतीने कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अवघ्या सात दिवसात १२० बेडचे रुग्णालय सुरू केले. त्यासाठी आदिसागर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनानेही मोलाची साथ दिली. १०० आॅक्सिजन बेड व संशयितांसाठी २० बेडची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय रॅपिड अँटिजेन चाचणीचीही व्यवस्था केली. रुग्णांना मोफत चाचण्या, उपचार आणि भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना मोठा दिलासा मिळाला होता.कापडणीस म्हणाले, गेल्या ५६ दिवसात ६४८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्याही घटली आहे. रुग्ण नसल्याने हे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालय सुरू केले जाईल. अँटिजेन व इतर चाचण्यांची महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सोय करण्यात आली आहे.