सांगली : महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनड्युटी भटकंती सुरू झाली आहे. सोमवारी उपायुक्त राहूल रोकडे यांनी विविध विभागाला भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी २० कर्मचारी हजेरीपत्रकावर सह्या करून गायब असल्याचे आढळून आले. तर काही कर्मचारी उशिरा कामावर आले होते. या कामचुकार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असून त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासक राज सुरू झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मोहिम उघडली आहे. सोमवारी उपायुक्त रोकडे यांनी महापालिकेतील विविध कार्यालयांना अचानकपणे भेटी दिल्या. यामध्ये आरोग्य, बांधकाम, नगररचना, विद्युत विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, गुंठेवारी कक्ष, टीबी विभाग, माहिती अधिकार कक्ष, आस्थापना, लेखापरीक्षण विभाग, ई टेंडर विभाग या विभागातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. या विभागात काही कर्मचारी हजेरीपत्रकावर सह्या करून गायब होते. त्यांनी हालचाल रजिस्टरवर नोंदी केलेली नव्हती. काहींनी विना अर्ज रजा घेतल्याचेही निदर्शनास आले. काही कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज लिपिकाकडे दिला होता. पण लिपिकाने तो खातेप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिला नसल्याची गंभीर बाबही समोर आली. या लिपिकाला उपायुक्तांनी धारेवर धरले. काही कर्मचारी उशिरा कार्यालयात आले होते. त्यांनाही प्रशासनाच्यावतीने नोटीस देण्यात आली. त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा इशाराही उपायुक्तांनी दिला.
सांगली महापालिका कर्मचाऱ्यांची ऑनड्युटी भटकंती, उपायुक्तांकडून झाडाझडती; २० कर्मचाऱ्यांना नोटीसा
By शीतल पाटील | Published: August 21, 2023 4:30 PM