सांगली : महापालिका प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना रस्ते खुदाईला परवानगी दिली आहे. तीन शहरात केवळ नऊ किलोमीटरची चर खुदाई होणार आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जादा रस्त्यांची खुदाई होणार असल्याचा संशय व्यक्त करीत, गुरुवारी स्थायी समिती सभेत रस्ते खुदाईत घोटाळ्याचा आरोप खुद्द सभापती बसवेश्वर सातपुते यांच्यासह नगरसेवकांनी केला. प्रशासनाने गेल्या वर्षभरात नव्याने केलेल्या रस्त्यांची चाळण करण्याचा डाव आखल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.सभापती सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सांगली महापालिका स्थायी समितीची सभा झाली. नगरसेविका प्रियांका बंडगर यांनी मोबाईल कंपन्यांना चर खुदाईच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर नगरसेवकांनी कोणकोणत्या भागातील रस्त्यांची खुदाई होणार असल्याची माहिती प्रशासनाकडे मागितली, पण प्रशासनाने उलटसुलट उत्तरे देत या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
अखेर सभापती सातपुते यांनी मंजुरीची फाईल सादर करण्याचे आदेश दिले. ही फाईल आल्यानंतर सर्वच नगरसेवकांना धक्का बसला. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरातील बहुतांश वॉर्डातील रस्ते खुदाई केले जाणार असल्याचे समोर आले. त्यानंतर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. वर्ष, दीड वर्षापूर्वी नवीन रस्ते केले आहेत. काही रस्त्यांची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत. अशा स्थितीत पुन्हा रस्त्यांची चाळण करण्याचा प्रशासनाचा उद्देश दिसतो.
अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून मोबाईल कंपन्यांना चर खुदाईला परवानगी दिली आहे. तेथील रस्त्यांच्या स्थितीचाही आढावा घेतलेला नाही. बऱ्याच कालावधीनंतर चांगले रस्ते झाले आहेत. त्या रस्त्यावर कशी परवानगी देण्यात आली? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. शहर अभियंता बामणे यांनी मोबाईल कंपन्यांना बोअरिंग करण्यास मंजुरी देण्याचा खुलासा केला. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. प्रत्यक्षात चर खुदाई सुरू असल्याचे सांगितले.
प्रशासनाने महापालिका हद्दीत ९ किलोमीटरचे रस्ते खुदाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यापोटी कंपनीकडून ३ कोटी रुपये भरून घेतले आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची तफावत दिसून येते. नऊ किलोमीटरपेक्षा जादा रस्त्यांची खुदाई होणार आहे. या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा आरोप सभापती सातपुते यांनीच केला. खुदाई थांबवून फेरसर्व्हे करण्याचे आदेश दिले.स्थायी समिती सभेतील चर्चा
- विश्रामबाग परिसरातील दत्तनगर, पार्श्वनाथ कॉलनीत नवीन जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करणार
- जाहिरात फलक काढून टाकून रितसर अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश
- बेकायदा बांधकामावर हार्डशीपअंतर्गत कारवाई करण्यात प्रशासनाची टाळाटाळ
- वानलेसवाडी नाल्यावर बांधकाम केलेल्या बिल्डरांना नोटीस न देता नागरिकांवर कारवाईचा घाट
- बालाजी चौकातील अतिक्रमित इमारतीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश
- शंभर फुटी रस्त्यावर विद्युत खांबावरील जाहिरात फलक, ठेकेदार एलईडी बल्ब दुरुस्त करीत नसल्याची तक्रार
सांगलीवाडीत चर खुदाईत तफावतवनगरसेवक दिलीप पाटील म्हणाले की, सांगलीवाडीत लक्ष्मी फाटा ते पतंगराव कदम महाविद्यालय, नाईकबा मंदिर, शाळा नंबर ९, पवार कॉलनी, सोसायटी परिसर या भागात मोबाईल कंपन्यांना चर खुदाईला मान्यता दिली आहे.
प्रशासनाने सांगलीवाडीत केवळ ९५० मीटर खुदाई दाखविली आहे. त्यापोटी कंपनीकडून ३२ लाख भरून घेतले आहेत. लक्ष्मी फाटा ते पतंगराव कदम महाविद्यालयापर्यंतचे अंतर ४ किलोमीटर आहे. त्याशिवाय गावातील इतर भागातील खुदाईचा विचार करता, त्यात मोठी तफावत दिसून येते. आपण स्वत: या चर खुदाईची मोजमाप करणार आहोत. गेल्या वर्ष, दीड वर्षात नव्याने झालेल्या रस्त्यावरही खुदाई होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे.