सांगली - सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. या गोंधळातच महापौरांनी उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने या दोघांना निलंबित केले. अखेर माने यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवून नेला. अखेर महापौरांनी ही सभा रद्द करत माने व घाडगे या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी माळ बंगल्याच्या वादग्रस्त जागा खरेदीचा अहवाल महासभेसमोर सादर करा अशी मागणी केली. याला आक्षेप घेत उपमहापौर गटाचे नेते शेखर माने व उपमहापौर विजय घाडगे यांनी सभा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका घेत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. सत्ताधारी गटानेही महापौरांच्या आसनासमोर जमा होत अहवालाचे वाचन करा अशी मागणी केली. यावरून दोन्ही बाजूने सभागृहात प्रचंड गदारोळाला सुरुवात झाली. एकमेकांचे उणेदुणे काढत दोन्ही बाजूने आरोप करीत असभ्य भाषेचा वापरही सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकारी उपस्थित असल्याने सभा कायदेशीर असावी आणि सभेचे कामकाज सुरू करावे, अशी भूमिका सत्ताधाऱयांना साथ दिली. महापौरांसमोरच शेखर माने, मैनुद्दीन बागवान, धनपाल खोत, सुरेश आवटी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आवटी यांनी तर लोकांतून निवडून या असे आव्हानच माने यांना दिले. तर माने यांनी यांचे नगरसेवकपद रद्द झाले, यांना बोलण्याचा अधिकार नाही असे आवटींना प्रत्युत्तर दिले. सभागृहात रिव्हॉल्वर काढा, फायरिंग करा अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यामुळे सभेतील वातावरण तणावपूर्ण बनले. सत्ताधारी गटाने उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने यांना सभागृहबाहेर काढा, त्यांना निलंबित केले आहे, यासाठी आक्रमक पवित्र घेत महापौरांच्या आसमासमोरच ठिय्या मारला. माने व घाडगे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून नगरसेवक संतोष पाटील व काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृह सोडण्याची तयारी चालवली. या गोंधळात शेखर माने यांनी महापौरांच्या आसनासमोर राजदंड पळविला. माने यांच्या बरोबरच उपमहापौर घाडगेही सभागृहातून बाहेर पडले.त्यानंतर महापौराने ही सभा रद्द करत दोघांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. सभेनंतर महापौराने शेखर माने यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करत त्यांच्या गुंडगिरीला भीक घालत नाही. माळबंगल्याचा अहवाल दडपण्यासाठीच सभेत धिंगाणा घातला आहे अशी टीका केली. घनकचरा प्रकल्पाचा आराखडा कायदेशीर कचाट्यात अडकू नये यासाठी ही सभा रद्द केली असून पुढील आठवड्यात नव्याने सभा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी माळ बंगल्याच्या जागा कृतीचा अहवाल सभेत सादर होऊ नये यासाठी शेखर माने यांनी दंगा घातला. या त्यांचे हितसंबंध गुंतले आहेत की काय? अशी शंका येते. या जागेचा सोक्षमोक्ष लावला सोय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. तर शेखर माने यांनी बेचाळीस कोटी रुपयांच्या लुटीचा उद्योग महासभेत हाणून पडला आहे. महापौरांनी एकेरी भाषेचा वापर करून पदाची गरिमा घालवली आहे, असा आरोप केला.
सांगली महापालिकेच्या सभेत राडा, उपमहापौर गटाने राजदंड पळवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 4:53 PM