सांगली : किरकोळ वादातून महिन्यापूर्वी श्रीमुखात लगाविलेला राग मनात धरुन बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शांताराम शिखरे (वय २२) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, बुर्ली) यास पलूस पोलिसांनी अटक केली आहे.मृत गणेश व कुणाल हे दोघेही सेंट्रीग काम करीत होते. महिन्यापूर्वी त्यांच्यात कामावर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादातून दोघांनी ऐकमेकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. ते ऐकमेकांशी बोलत नव्हते. गुरुवारी रात्री आठ वाजता गणेश गावातील चौकात मिरवणुक पाहण्यास उभा होता. त्यावेळी कुणाल तिथे गेला. त्याने महिन्यापूर्वी झालेल्या वाद उकरुन काढला.
यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. कुणालने कंबरेला लावलेला चाकू काढून गणेशला भोसकले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच कुणाल पसार झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी संशयित कुणाला यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे.