सांगली : भाजपकडून समाजात फूट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेले आहे. त्यांच्या धन्याला खूश करण्यासाठी ते पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर बेताल वक्तव्य करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
अविनाश पाटील म्हणाले, पडळकर हे मागच्या दाराने विधान परिषदेत आलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्यावर त्यानंतर आमदार अनिल बाबर यांच्या विषयी अशीच बेताल बडबड केली. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून खासदार संजय पाटील यांच्यापर्यंत विरोधात भडक विधाने केली होती. त्यावेळी त्यांना सांगलीच्या जनतेने चोक उत्तर दिली आहेत.
सहा महिन्यातच बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी घेऊन पवार घराण्यावर टीका केली. पण तेथील जनतेने त्यांना साफ नाकारले. आत्तापर्यंत त्यांनी एकही प्रश्न तडीस लावला नाही. अपुऱ्या माहितीवर जनतेची डोकी भडकून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम ते करत आहेत.
नामदार पाटील यांनी केलेल्या कामावर बोलायला पडळकर यांच्या पाच पिढ्यांनी जरी अभ्यास केला तरी तो त्यांना अपुरा पडेल. वायफळ बडबड करण्याऐवजी त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. विकासकामे करण्याला प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही पाटील यांनी पडळकरांना केली.
राष्ट्रवादी रोहित पाटील यांच्या पाठीशी
अविनाश पाटील म्हणाले, कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये रोहित पाटील याच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने प्रचारात आहे. त्या ठिकाणी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पक्षाचे नेतेही राष्ट्रवादीबरोबरच असणार आहेत. काहींनी पक्ष विरोधात काम करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्या विरोधातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार आहे.