सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव निश्चित असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने मात्र निवडणूक लढविण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बैठकीनंतरच निवडणूक लढविण्याबाबत निर्णय होणार आहे.मोदी लाटेत राज्यातील काँग्रेसचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले. परंतु, डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे काँग्रेसचा गड शाबूत राहिला होता. त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचा उमेदवार ठरणार असला तरीही, डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. जिल्'ातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही विश्वजित कदम यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाकडून उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले.
पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत दि. २९ एप्रिलरोजी पुणे येथे राष्ट्रवादीची राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादीची ठोस भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. मात्र राष्ट्रवादी कधीच जातीयवादी पक्षाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे निश्चितच काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.तत्कालीन भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संपतराव देशमुख यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर १९९७च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला होता.
काँग्रेसच्या तेव्हाच्या या भूमिकेमुळे भाजप आताची निवडणूक लढविणार की गप्प राहणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यात बैठक होऊन, निवडणूक लढवावी की नाही, याबाबतचा फैसला होणार आहे. त्यापूर्वी दि. ३ मे रोजी सांगलीतही भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
या बैठकीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे. भाजपने उमेदवार दिलाच तर कोण असणार, अशीही चर्चा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यापैकी एकाची उमेदवारी असे ल, असेही पक्षाकडून सांगितले जात आहे.पलूस-कडेगाव येथे पोटनिवडणूक लढविण्याबाबत भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक होऊन राज्यातील पोटनिवडणुकांबाबत निर्णय होणार आहे. त्यानंतरच तो जाहीर केला जाईल.- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप, सांगली.
पलूस-कडेगावमधून कोण उमेदवार असावा, याबाबत पलूस-कडेगाव तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अन्य पक्षांनी सहकार्य केले नाही तर, निवडणूक लढण्याचीही आमची तयारी आहे.- मोहनराव कदम,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, सांगली.
राष्ट्रवादीकडून पलूस-कडेगाव येथील पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला जाणार नाही. पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार, दि. २९ एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे. या बैठकीत पोटनिवडणुकीबाबत धोरण निश्चित होणार आहे.- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सांगली.