सांगली : दुधाच्या दराचा तिढा आता सुटला आहे. अनुदान मिळाल्याने पूर्वी २३ रुपयाने खरेदी होणारे दूध २८ रुपयांनी खरेदी झाले पाहिजे. हे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, कोणाच्या दबावाने सरकारने दूध दराविषयीचा निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीच दुधाच्या भुकटीवरील अनुदानाचा निर्णय झाला होता. त्याबद्दल अडचणी निर्माण झाल्याने आता खरेदी करणाऱ्या संघ व संस्थांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ५ रुपये वाढीव दर उत्पादकांना मिळाला पाहिजे. ज्यांनी यासाठी आंदोलन केले त्यांनी या गोष्टींवर लक्ष ठेवावे.
शेतकऱ्यांना दूधाचा योग्य दर आता मिळाला नाही तर शासकीय अनुदानावर संबंधितांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट होईल. अशा लोकांवर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल, मात्र तोपर्यंत हे काळे बोके समाजासमोर येतील.
काही दूध संघ तोटा सहन करून शेतकऱ्यांना दर देत असल्याचा कांगावा करण्याची शक्यता आहे. त्यांनी हे अनुदान दरवाढीसाठी न वापरता तोटा भरून काढण्यासाठी वापरले तर त्यांच्याविषयी संबंधित आंदोलनकर्ते काय करणार, असा प्रश्नही उपस्थित होतो. त्यांचे आंदोलन उत्पादकांसाठी होते की या संस्थांच्या भल्यासाठी होते, हेसुद्धा कळेल.सरकार फसवेल, अशी भाषा करणाऱ्यांनीच अनुदानाचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला होता. त्यामुळे ताटातले जेवण संपवून हात धुवायचा आणि नंतर जेवणाविषयी टीका करायची, असा हा प्रकार झाला.
सरकारने आजवर जे निर्णय घेतले आहेत, त्याची अंमलबजावणी झालेली आहे. याऊलट आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता. २0१0 ते २0१४ या आघाडी सरकारच्या काळात झालेले निर्णय, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि प्रत्यक्ष झालेला खर्च पाहता तुलनेने कितीतरी पटीने सध्याच्या भाजप युती सरकारच्या काळात अधिक खर्च झाला आहे.
सुक्ष्म सिंचन योजना, कर्जमाफी, परदेशी शेतीमालांवरील निर्यात शुल्क वाढ, स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चिती, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, ठिबक सिंचन अनुदान अशा अनेक योजनांसाठीची दोन्ही सरकारच्या काळातील आकडेवारी समोर आली आहे.जयंतराव असे बोलणार नाहीत!चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात, हे आम्हालासुद्धा माहित आहे. तरीही जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते कोणाच्या तरी हद्दपारीची किंवा धडा शिकविण्याची भाषा वापरणार नाहीत, असे मत सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केले.आदेश मिळाला तर निवडणूक लढवू!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला तर हातकणंगलेच काय, कोणत्याही ठिकाणी निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीविषयी माझी भूमिका ठरलेली आहे, असे खोत यांनी स्पष्ट केले.