सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या मोफत योजनेत रुग्णांकडून पैसे उकळल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुग्णालयांना सोमवारी मोठी झटका बसला. जिल्ह्यातील पाच प्रतिष्ठित रुग्णालयांना महात्मा फुले योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आणखी काही रुग्णालये रडारवर असल्याचे समजते.केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह काही योजना हाती घेतल्या आहेत. या योजनेतर्गंत दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काही रुग्णालयांचा योजनेसाठी समावेश करण्यात आला होता. मात्र काही रुग्णालयांना रुग्णांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी शासनस्तरावर गेल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शासनाच्या आरोग्य विभागाने दहा पथके नियुक्त करून तपासणीचे आदेश दिले होते.त्यानुसार गेल्या दोन दिवसांत सांगली जिल्ह्यातील २२ रुग्णालयावर दिल्ली व मुंबईतील पथकाने छापे टाकले होते. गेल्या सहा महिन्यात या योजनेतर्गंत रुग्णांवर उपचार केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. यात पाच रुग्णालये प्राथमिक तपासणीत दोषी आढळल्याने त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यातील दोन रुग्णालये सांगलीतील आहे. तर इस्लामपूर, आष्टा व मिरजेतील एका रुग्णालयाचा समावेश आहे. ही सर्व रुग्णालये प्रतिष्ठित डॉक्टरांची आहेत. तर एक रुग्णालय राजकीय नेत्याशी संबंधित आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.