सांगली : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी गतीने सुरू केली आहे. दररोज ३७५ जंबो सिलिंडर द्रव ऑक्सिजनचे उत्पादन या प्रकल्पांत केले जाईल.
कोरोना काळात जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली होती, त्यानुसार सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांत उभारणी सुरू केली आहे. मिरजेतील शासकीय रुग्णालयात सध्या १८ टन क्षमतेच्या साठवण टाक्या आहेत, तर सांगली रुग्णालयात १२ टनाची टाकी आहे. सांगलीत १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या साठवण टाकीचे उद्घाटन मे महिन्यात झाले होते. दोन्ही रुग्णालयांत बाहेरून ऑक्सिजनचे टँकर मागवून टाक्यांमध्ये तो भरला जातो. ऑक्सिजनबाबतीत स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने आता प्रत्यक्ष निर्मिती केली जाईल.
सांगलीतील प्रकल्पात दररोज १२५ जंबो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असेल, तर मिरजेत दररोज २५० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होईल. या यंत्रणेत हवेतून शुद्ध ऑक्सिजन शोषून तो द्रव स्वरूपात साठवला जातो. मिरजेतील प्रकल्पाचा खर्च १ कोटी ८० लाख रुपये, तर सांगलीतील प्रकल्पाचा ९० लाख रुपये आहे. सांगली शासकीय रुग्णालयात दररोज अर्धा ते एक टन ऑक्सिजन खर्ची पडतो. सध्याची टाकी १७ ते १८ दिवस ऑक्सिजन पुरवू शकते. येथे निर्मिती सुरू झाल्यानंतर बाहेरून टँकर मागवावा लागणार नाही.
चौकट
सिलिंडरमध्ये भरण्याचा खर्च जास्त
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत तो सिलिंडरमध्ये भरण्याचा खर्चच जास्त आहे. सांगली व मिरजेत प्रत्येकी ३५ लाख रुपयांची यंत्रणा त्यासाठी उभारावी लागेल. हा खर्च सध्याच्या प्रकल्पात समाविष्ट नाही. नव्याने तरतूद करावी लागणार आहे.
चौकट
प्रकल्प असेल तरच परवानगी
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमावलींनुसार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अत्यावश्यक करण्यात आला आहे. तो असेल तरच महाविद्यालयाला मान्यता मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार प्रत्येक ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातही प्रकल्पाची सक्ती करण्यात आली आहे.