सांगली : वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज व सांगलीतील तरुणांना वैद्यकीय कौशल्य आत्मसात करता यावे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मत्र्यांकडे सादर केला आहे. त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, डायलेसिस, रेडिओलॉजीसह अनेक पॅरामेडिकल कोर्सेस करून सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी याठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सुरू होण्याची गरज आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली.
यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी आम्ही मागणी केली. देशमुख यांनी लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर याठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन मशिन व एन्जिओग्राफीची मशिनचाही प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर सांगलीत शंभर खाटांचे वाढीव रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. त्याबाबतही सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात याबाबत निर्णय अपेक्षित आहे. सांगलीला स्कीन लॅब सुरू करावी व शासकीय रुग्णालयाच्या डागडुजी व नुतनीकरणासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केल्यानंतर देशमुख यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.बामणोलीला साठ वर्षे पूर्णकोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या बामणोली गावास यंदा साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गावातील सुविधांसाठी साडे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने दिला होता. त्याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एप्रिलमध्ये गावाचा हिरकमहोत्सवी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
दोन रस्त्यांना मंजुरीकर्नाळ ते बिसूर आणि कर्नाळ ते बुधगाव अशा दोन रस्त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. १ कोटी २५ लाखांचे हे रस्ते असून ग्रामस्थांसोबत याबाबतचा पाठपुरावा करण्यात आला होता. त्यास यश मिळाले असून येत्या महिन्याभरात कामास सुरुवात होईल, असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.