सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या धूम बायकर्सना वाहतूक पोलीसांनी वेसण घातली. रात्री विशेष मोहिम राबवून तब्बल ४९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४९ हजार रुपयांची दंड वसुली केली. याबाबत `लोकमत`ने बुधवारी (दि. १२) वृत्त प्रसिद्ध केले होते.सांगली - मिरज रस्त्यावर कानठळ्या बसविणाऱ्या आवाजासह सुसाट धावणाऱ्या दुचाकींमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. विश्रामबाग ते वानलेसवाडी दरम्यान दररोज रात्री परदेशी बनावटीच्या दुचाकी गाड्या अपघाताची पर्वा न करता भरधाव पळविल्या जातात. कॉलेजकुमारांचा उत्साह अन्य प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.८० ते १०० किलोमीटर प्रतितास गतीने पळविल्या जाणाऱ्या गाड्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे प्रवाशांचे वाहनावर नियंत्रणही राहत नाही. विश्रामबाग, विजयनगर, वानलेसवाडी या टप्प्यातील ही रेस धोकादायक ठरत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले.त्याची दखल वाहतूक शाखेने घेतली. विशेष मोहिमेत ४९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ४९ हजार रुपये वसूल केले.४७ जणांनी दुचाकीत केले फेरबदलकारवाई झालेल्या ४७ दुचाकींमध्ये बेकायदेशीर फेरबदल केले होते. चारही इंडिकेटर्स एकाचवेळी उघडझाप करणारे होते. काहींचे हेडलाईटस अत्यंत प्रखर होते. काहींनी सायलेन्सर काढून टाकले होते, तर काहींनी पॉवर हॉर्न बसविले होते. या सर्वांना वाहतूक पोलीसांनी दंड ठोठावला. सहाय्यक निरिक्षक प्रज्ञा देशमुख यांनी सांगितले की, सांगली-मिरज रस्त्यावर अशी कारवाई सुरुच ठेवणार आहोत. प्रसंगी वाहनेदेखील जप्त केली जातील.
सांगली-मिरज रस्त्यावर धूम बायकर्स सुसाट, पोलिसांनी लावला चाप; ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 2:31 PM