सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारतीवरुन अनिल केशव माने (वय ५५, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, शंभरफुटी रस्ता, सांगली) या रुग्णाने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. आजाराला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.अनिल माने यांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्या लिव्हरला आजार झाला आहे. तसेच त्यांना पोटाचाही विकार उद्भवला आहे. घरच्यांनी त्यांना १७ जून रोजी उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. वॉर्ड क्रमांक ५९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळी वॉर्डामध्ये डॉक्टर तपासणीला आले होते. माने यांच्या मुलांसोबत डॉक्टर पोटाच्या विकाराबाबत चर्चा करीत होते. नाकावाटे पाईप टाकून उपचार करुया, असे डॉक्टर सांगत होते. हे ऐकून माने तेथून बाहेर पडले. ते थेट रुग्णालय इमारतीच्या छतावर गेले. तेथून त्यांनी उडी घेतली. ते वॉर्ड क्रमांक चाळीसच्या पिछाडीस दगडावर पडले. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाºयांनी धाव घेतली. माने यांना तातडीने परत उपचारासाठी दाखल केले.
गुन्हा दाखल होणार!
माने यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही वॉर्डातील खिडकीतून उडी घेऊन रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण थेट इमारतीवरुन उडी घेण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.