लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पेठ-सांगली या राज्य महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दिवाळीच्यादिवशी सर्वपक्षीय कृती समितीने अनोखे आंदोलन केले. या रस्त्यावरील खड्ड्यांत हजारो दिवे लावत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाचा हा पहिला टप्पा यशस्वी ठरल्यानंतर आता बांधकाम विभागाच्या अधिकाºयांविरोधात न्यायालयीन लढा हाती घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.सांगली ते पेठ हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावर सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या मार्गावर जवळपास १६ गावे येतात. दररोज हजारो दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्यावरून धावतात. पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकविताना दुभाजकावर आदळून, इतर वाहनांखाली येऊन कित्येकांना प्राण गमावावा लागला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेची स्थिती भयावह आहे.याविरोधात सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. दिवाळीच्यादिवशी मंगळवारी सांगलीवाडी टोलनाक्यापासून खड्ड्यांत दिवे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. सांगलीतील कृती समितीने टोलनाका ते लक्ष्मी फाट्यापर्यंत खड्ड्यांत दिवे लावले. कसबे डिग्रज, तुंग या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या गावाजवळ खड्ड्यांत दिवे लावत शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध केला. लक्ष्मी फाटा येथे या रस्त्यावर अपघातात बळी पडलेल्यांना आदरांजलीही वाहण्यात आली.या आंदोलनात अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. अमित शिंदे, माजी महापौर सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, नगरसेवक प्रशांत पाटील मजलेकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, आर. बी. शिंदे, स्वाभिमानी आघाडीचे सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, अतुल शहा, कुमार पाटील, आशिष कोरी, अश्रफ वांकर, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, अमर पडळकर, सागर घोडके, आयुब पटेल, युसूफ मिस्त्री, आसिफ बावा, आयुब पठाण, किरणराज कांबळे, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, रमेश माळी, गणेश माने, उदय साळवे, अनिकेत खिलारे, अनिल शेटे आदींनी सहभाग घेतला होता.पेठ-सांगली रस्ता तातडीने दुरुस्त करावा यासाठी आष्टा-सांगली रस्त्यावर आष्ट्यात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. आष्टा येथे सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, रघुनाथ जाधव, सुदर्शन वाडकर, पोपट भानुसे, अनिल पाटील, संभाजी माळी, उदय कुशिरे, प्रभाकर जाधव, सतीश माळी, दादा शेळके, आप्पा जाधव, महेश गायकवाड, रणजित पाटील, अंकुश मदने उपस्थित होते. कसबे डिग्रज व तुंग येथे अजयसिंह चव्हाण, रामदास कोळी, विजय डांगे, भास्कर पाटील आदींनी आंदोलन केले.आष्टा, डिग्रज, तुंग येथेही आंदोलनन्यायालयीन लढा देणार : जाधवसांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यावर दिवे लावण्याची वेळ आली आहे. मी व अमित शिंदे यांनी विधी व सेवा प्राधिकरणाकडे रस्त्याबाबत तक्रार केली आहे. कोणत्याही पक्षाचे शासन सत्तेवर आले तरी, कर भरणाºया नागरिकांना सुविधा दिल्या जात नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत संबंधित अधिकाºयांवर कारवाईबाबत कोणतेही कायदे अस्तित्वात नाहीत. पण कर भरणाºया नागरिकांना चांगला रस्ता देण्याची शासनाची हमी हवी. हा आमचा हक्क आहे. कायदा नसल्याने आज आपल्याला आंदोलन करावे लागत आहे. लवकरच मी बांधकाम खात्यातील अधिकाºयांविरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे, असे अॅड. श्रीकांत जाधव यांनी सांगितले.
सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे उजळले दिव्यांनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:11 AM