शीतल पाटीलसांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ट अजूनही संपलेले नाही. चौपदरीकरणाच्या कामाचा नारळ फुटून पाच महिने झाली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दराचा अंतिम लिफाफा उघडलेला नाही. परिणामी वाहनचालकांना आजही जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे श्रेय घेण्यात आघाडीवर असलेले लोकप्रतिनिधीही सध्या चिडीचूप आहेत.वाहनांची मोठी वर्दळ, अपघातांची मालिका, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे सांगली-पेठ रस्ता कित्येक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. जिल्ह्यातील इतर शहरे महामार्गाने जोडली जात असताना पेठ रस्त्याबाबत मात्र लोकप्रतिनिधी, शासनाने पाठ फिरविली होती. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून चौपदरीकरणासाठी लढा उभारला गेला. अनेक आंदोलने झाली. त्यानंतर राज्य शासनाला जाग आली आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला.महामार्ग प्राधिकरणाने ४१ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. ८६६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला. जलदगतीने कामे करण्याचा अनुभव असलेल्या केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागानेही रस्ता मंजुरीसाठी बराच कालावधी लावला. अनेक अडथळे पार करीत वाहतूक मंत्रालय, अर्थ समितीच्या मान्यतेने निविदा प्रक्रियेचा मुहूर्त सापडला.निविदेपूर्वीच आष्टा येथे चौपदरीकरणाच्या कामाचा नारळही फोडण्यात आला. राजकीय नेते श्रेयवादासाठी पुढे आली. पण, आता निविदा प्रक्रिया रखडली आहे. या कामासाठी देशभरातील १२ कंपन्यांनी निविदा भरली आहे. तांत्रिक लिफाफा उघडला गेला आहे. पण अजून दराचा लिफाफा उघडलेला नाही. तो कधी उघडणार, ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर कधी मिळणार, या प्रश्नांची उत्तरे ना प्राधिकरणाकडे आहेत, ना लोकप्रतिनिधींकडे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने वर्कऑर्डर मिळाली तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार नाही. परिणामी आणखी काही महिने नागरिकांनी जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे.
रस्त्याची सद्य:स्थितीसांगली ते कसबे डिग्रज फाटा रस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. पण अनेक ठिकाणी दुभाजक फुटलेले आहेत. डिग्रज ते आष्ट्यापर्यंत रस्त्यावर खड्डे होते. गेल्या महिन्यात पॅचवर्क केले आहे. पण ते तकलादू आहे. पावसाळ्यात पॅचवर्क वाहून जाण्याचीच शक्यता आहे. पेठपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे.