सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झाली आहे. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांच्या बाजूला असलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संबंधितांना दिल्या.तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज या तालुक्यात पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्व संबंधित तहसिलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, पाटबंधारे अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, भरून घेतलेल्या पाण्यामुळे जुन, जुलै 2018 अखेर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच पाण्याच्या पर्क्युलेशनमुळे देखील आजूबाजूच्या परिसरात पाणी उपलब्धता रहाणार आहे.
पाणी भरून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्वरित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाटबंधारे विभागाला आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात येईल.