सांगली : हरिपूरजवळ रस्त्याकडेला थांबून सेल्फी घेणाऱ्या तरुणींना पिस्तुलाच्या साह्याने धमकावून लुटणाऱ्या इचलकरंजीतील जर्मन टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाइल, छर्ऱ्याचे पिस्तूल, दोन दुचाकी असा ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खालिद राजू हुंडेकर (२०), नौशाद करीम मुजावर (२३), निखिल शंकर पाटील (१९), नईम हसन कोकटनूर (२७), आयुब अहमद आत्तार (सर्व रा. कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी दोन तरुणी हरिपूरजवळ रस्त्याकडेला थांबून सेल्फी घेत होत्या. यावेळी पाच जणांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील तीन मोबाइल काढून घेतले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथक याचा तपास करत होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, जबरी चोरीतील मोबाइल शाहरूख पाटील (रा. तुरंबे, जि. कोल्हापूर) याच्याकडे असून तो जयसिंगपूरजवळील चौंडेश्वरी फाटा येथे थांबला आहे.
त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. यावेळी साजीद गैबान यांच्याकडून मोबाइल घेतल्याचे त्याने सांगितले. साजीदने त्याचा मित्र खालिद हुंडेकर याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिस पथकाने या टोळीचा छडा लावला. कबनूर येथे जाऊन सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यात खालिद हुंडेकर याच्याकडे पिस्तूल मिळून आले.हरिपूर येथील नदीकाठावर दोन तरुणी फोटो काढत होत्या. तेथे जाऊन शस्त्राच्या धाकाने त्यांच्याकडील तीन मोबाइल काढून घेतल्याची कबुली त्यांनी दिली. यातील एक मोबाइल त्यांनी फोडून टाकला आहे, तर एक मोबाइल विकल्याचे सांगितले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप नलवडे, हेमंत ओमासे, सुनील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.रेकाॅर्डवरील संशयितपोलिसांनी जेरबंद केलेले संशयित इचलकरंजी येथील जर्मन टोळीतील गुंड आहेत. यातील नौशाद मुजावर, नईम कोकटनूर व निखिल पाटील यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत.