सांगली : विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत गुप्तवार्ता विभागाचे पोलिस का येतात? आमच्या पत्रकार परिषदांना पोलिस का येतात? हुकूमशाही आणि दडपशाही सुरू आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सांगली येथील हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी आहेत, असेही देशमुखांनी म्हटले होते. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या एकाही चहापानाला हजर नव्हतो. आम्ही त्यांच्या चहापानावरच बहिष्कार टाकलेला आहे. एक कप चहाच्याही आम्ही मिंध्यात नाही. विरोधक कुठल्याही चहापाण्यावर गेलेले असतील तर, मंत्री सुभाष देशमुख यांनी, तो पुरावा दाखवावा. अशा शब्दात अजित पवार यांनी या दौऱ्यात सरकारला आव्हान दिले आहे.
सरकार सर्वांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता पत्रकारांवर, वृत्तपत्रांवर बंधने आणण्याचे त्यांचे काम सुरू झाले आहे. १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी आणली गेली. त्यानंतर जनतेने ते सरकारच उलथवून लावले. त्यामुळे भाजपने बंधने लादताना, मुस्कटदाबी करताना पुन्हा सत्तेवर येण्याच्या भ्रमात राहू नये. सरकार सत्तेच्या धुंदीत काम करीत आहे.
ते म्हणाले, भाजपाच्या नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये होत आहेत. विकासाच्या मुद्यावर निवडून आले, मात्र निवडून आल्यावर मात्र भाजपा सरकार धार्मिक अजेंडा राबवत आहे. तासगावमध्ये शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा विरोध आहे.शिवसेना म्हणजे ढेपेला चिकटलेला मुंगळापवार म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांनी राज्यसभेचे उपसभापतीपद कोणाला द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यातही विधानसभेच्या उपाध्यक्षांची जागा तीन वर्षांपासून रिक्त आहे. हे पद कोणाला द्यायचे, यात सत्ताधाऱ्यांचे एकमत झालेले नाही. शिवसेनेला दिले तरी आश्चर्य वाटणार नाही. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो तशी शिवसेनेची अवस्था आहे. पत्रकार परिषदेला पोलिस कसे?आम्हीही राज्यातील सत्ता चालविली आहे. कधी दुसऱ्यांच्या कामात लुडबुड केली नाही. सांगलीत पत्रकार परिषदेला भाजपच्या सरकारने मात्र पोलिसांना पाठविले आहे. हा कसला प्रकार आहे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. शिवसेनेची मळमळ बाहेर आली!पवार म्हणाले की, मी शिवसेनेला दुतोंडी गांडुळ म्हणालो म्हणून त्यांनी मला विषारी सापाची उपमा दिली. शिवसेनेने त्यांनी मळमळ बाहेर काढली. कोण काय आहे आणि कोणाच्या पाठीशी रहायचे, हे आता जनतेला ठरवू द्या. सामना दैनिकातून शिवसेना जरी मळमळ व्यक्त करत असली, तरी, शिवसेनेचीच भूमिका दुटप्पी आहे. मेस्मा लावताना, त्याला तुमच्या मंत्र्यांची मूक संमती होती का, तुम्ही डरपोक आहात? एसटीच्या खासगीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध आहे.
राज्यातील खोटारड्या सरकारने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अजून शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला नाही. संभाजी निलंगेकर यांना ७८ कोटीच्या कर्जाला ५३ कोटींची माफी दिली, मात्र शेतकऱ्यांना कर्जातून मुुक्ती दिली जात नाही, असा टोमणाही यावेळी त्यांनी मारला.सर्वच क्षेत्रात बेरोजगारांना एकीकडे रोजगाराचे केवळ आश्वासन दिले जात आहे, मात्र दुसरीकडे, शासकीय नोकऱ्यांमधील रिक्त पदे रद्द करण्याचा डाव सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.या दौऱ्यात सहभागी असलेल्या सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, धर्मांध सरकारपासून मुक्ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकते, हा जनतेला विश्वास आहे. सांगलीत विद्यमान खासदारांची गुंडगिरी सुरू आहे. त्याविरोधात रोष बघायला मिळतोय. सिंचन घोटाळ्यासंदर्भात, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे यावर जास्त वक्तव्य करणार नाही. मात्र पूर्वीपासून आम्ही चौकशीला सहकार्य करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत. या चौकशीतून लवकरात लवकर सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा आहे, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.