दत्ता पाटीलतासगाव : ‘ज्याला घोड्यावर बसवायलाही येतं आणि घोड्यावरून खाली खेचताही येतं, त्याला संजय पाटील म्हणतात. वैभवदादा... तुम्ही घोड्यावर बसायला सज्ज व्हा,’ असे आवाहन करत खासदार संजयकाका पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी विट्याचे राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांना विधानसभेसाठी अप्रत्यक्ष आमंत्रण दिले. निमित्त होते हातनूर (ता. तासगाव) येथे झालेल्या एका कार्यक्रमाचे.
भाजपचे विसापूर सर्कलचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या वडिलांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय चर्चा झाली नाही, तर नवलच. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनीच राजकीय एकोप्याचे आवाहन केले.
याच भाषणाचा संदर्भ घेत खासदार संजयकाका पाटील यांनी वैभव पाटील यांना ‘बोटचेपे धोरण बंद करा’, असे खडेबोल सुनावले. मागील विधानसभेला आटपाडीच्या देशमुख कुटुंबाचे नुकसान होण्यात स्वत: जबाबदार असल्याचे सांगितले. मी स्वत: अनेकांची समजूत काढून अनिल बाबरांना आमदार केले. मात्र ‘मला घोड्यावर बसवायलाही येतं आणि घोड्यावरून खालीही घेता येतं.’ असा सूचक इशारा पाटील यांनी बाबर यांचे नाव न घेता दिला. ‘अमरसिंह देशमुख यांनी केलेले आवाहन स्वीकारून, वैभवदादा.. तुम्ही घोड्यावर बसायला सज्ज व्हा’, असे सांगून वैभव पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे अप्रत्यक्ष आमंत्रणच दिले.संजयकाका आणि अमरसिंह देशमुख यांनी वैभव पाटील यांना विधानसभेसाठी भाजपात येण्याचे केलेले आवाहन कार्यक्रमात आणि तालुक्यातही चर्चेचा विषय ठरले.
खानापूर-आटपाडीत आमदार वेगळा असेल : देशमुखवैभव पाटील यांनी मनोगतात, मांजर्डे गटात भाजपच्या सचिन पाटील यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. हाच धागा पकडत आटपाडीचे भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी ‘वेगळ्या कोड्यात राहून मदत कशी करणार’, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वैभव पाटील यांनी ‘मदत नाही, तर सदिच्छा देणार आहोत’, असे सांगितले. यावर ‘तुम्ही जर सदिच्छा दिल्या, तर आम्हालाही नुसत्या सदिच्छा द्याव्या लागतील. मात्र येणाऱ्या विधानसभेला इथला आमदार वेगळा असेल’, असा सुचक इशारा देत वैभवदादांना भाजपत येण्याचे अप्रत्यक्ष आमंत्रण देशमुख यांनी दिले.