लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी ( जि. सांगली) : बाजार समितीमध्ये बुधवारी डाळिंबाला किलोला ६२५ रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा प्रथमच एवढा जास्त दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. आटपाडी बाजार समितीच्या आवारात दररोज डाळिंबाचे सौदे होत आहेत. मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स या पंढरीनाथ नागणे यांच्या डाळिंब सौद्यात पांडुरंग दत्तात्रय गायकवाड (रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला ६२५ रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. याशिवाय नामदेव बंडगर (रा. अनकढाळ) यांच्या डाळिंबाला ४२५ रुपये, सिद्धनाथ लक्ष्मण यमगर यांच्या डाळिंबाला ४०० रुपये, मनसूर इनाम शेख (रा. बलवडी) यांच्या डाळिंबाला ५२५ रुपये असा दर मिळाला.
स्पर्धेमुळे दरबाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, अतिवृष्टीने नव्वद टक्के बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंबाची आवक कमी आहे. दिवाळीच्या सणामुळे मागणी मोठी आहे. व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे विक्रमी दर मिळत आहे.