सांगली : गुरुकुल संगीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संगीत मैफलीने पं. हरीप्रसाद चौरासिया यांच्यावर मोहिनी घातली. तासभर रंगलेल्या या मैफलीनंतर चौरासिया यांनी लहान मुलांच्या बहारदार शास्त्रीय गायनाची प्रशंसा करीत त्यांना उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
स्टेशन चौकातील गुरुकुल महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हरीप्रसाद चौरासिया, पं. विजय घाटे, गोविंद बेडेकर उपस्थित होते. मैफलीची सुरुवात रोहित गुळवणीच्या भैरवीने झाली. त्याने ‘जागो जागो लाल मेरे’ हे गीत सादर केले. उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. चिन्मयी गोखले, मृणाल बर्वे, शर्वरी केळकर यांनी ‘हम रहीये रात बिरहन के पास’ हे जौनपुरी रागातील गीत सादर करून मने जिंकली. त्यानंतर अनुष्का माने, पुष्कर नाशिककर, सौम्य कोटणीस, तन्मयी जोशी यांनी ‘बिरज में धूम मचायो शाम’ हे भीमपलास रागातील गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
मैफलीनंतर चौरासिया म्हणाले की, ताल, सूर, लयींचा उत्तम अभ्यास मुलांकडून झाला आहे. त्यांचे गाणे ऐकताना मन सुखावते. त्यांनी अजून कष्ट करावेत, गुरुंच्या सानिध्यात रहात अधिकाधिक संगीत ग्रहण करावे. या गुरुकुलमधून मोठे कलाकार भविष्यात देशाला मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चौरासिया यांच्याहस्ते यावेळी गायिका व गुरुकुलच्या संचालिका मंजुषा पाटील, संगीत शिक्षक कृष्णा मुखेडकर, गोविंद बेडेकर, उमेश देसाई, विदुला केळकर, विजय फडके यांचा सत्कार करण्यात आला. चौरासिया यांच्या वाढदिवसानिमित्त पेढेवाटप करण्यात आले. गुरुकुलतर्फे यावेळी चौरासियांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मंजुषा पाटील यावेळी म्हणाल्या की, ज्यांच्या बासरीच्या सुरांनी देश-विदेशातील रसिकांवर मोहिनी घातली आहे, असे हरीप्रसाद चौरासिया यांचा सहवास गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना यानिमित्ताने लाभला. त्यांच्यासमोर गानसेवेची संधी मुलांना मिळाली. गुरुकुलसाठी हा सुवर्ण क्षण आहे.