- घनशाम नवाथे सांगली - येथील गेस्ट हाऊससमोरील सर्व्हीस रस्त्यावरील रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्सच्या किचनला गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. आगीत किचनमधील पॅकिंगचे साहित्य, सिलिंग आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आतील सात सिलिंडर पत्रा फोडून बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अधिक माहिती अशी, सर्व्हीस रस्त्यावर निकित तन्ना यांचे रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्स ही बेकरी आहे. समोरच्या बाजूला विविध खाद्यपदार्थ विक्रीचा भाग आहे. तर मागील बाजूस किचन आहे. संपूर्ण बेकरी पत्राच्या शेडमध्ये असून आतमध्ये सिलिंग करण्यात आले आहे. सायंकाळी सातच्या सुमारास किचनमध्ये ओव्हनच्या जवळ असलेल्या वीजेच्या तारेमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. आतमध्ये कर्मचारी होते. त्यांनी तत्काळ फायर एक्स्टिंग्युशरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पाच-सहा फायर एक्स्टिंग्युशरचा वापर करण्यात आला. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. तेवढ्यात महापालिका अग्निशमन दलाला कळवण्यात आले.
प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल माळी आणि जवान तत्काळ तीन गाड्यासह घटनास्थळी दाखल झाले. आग मागील बाजूस किचनमध्ये लागली होती. आतमध्ये सात सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. किचनच्या बाजूचा पत्रा उचकटून आतमध्ये पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यास सुरवात केली. तसेच सात सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दोन गाड्यांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आगीमध्ये आतील किचनमधील संपूर्ण सिलिंग जळाले. तसेच पॅकिंगचे बॉक्स, इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी विश्रामबाग पोलिसही तत्काळ दाखल झाले होते. सर्व्हीस रस्त्यावर वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. प्राथमिक तपासात सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बेकरीतील साहित्य सुरक्षितकिचनमध्ये लागलेली आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे बेकरीचा बाहेरील विक्रीचा भाग, काऊंटर आदी भाग आगीपासून सुरक्षित राहिला. अन्यथा मोठी हानी झाली असती असे सांगण्यात आले.