सांगली : जिल्हातून संपर्क क्रांतीला गेल्या १७ वर्षात १४० कोटीचे उत्पन्न देऊनही सांगलीरेल्वे स्थानकावरील थांबा मध्य रेल्वेने नाकारला आहे. त्यामुळे नागरिक जागृती मंचने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नव्या खासदारांसोबत याविरोधात नवा लढा पुकारण्याचा निर्धार मंचने केला आहे.मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या सतरा वर्षांत सांगली जिल्ह्यातून संपर्क क्रांतीची सुमारे २६ लाख तिकिटे विक्री झाली. प्रत्येक वर्षी सुमारे ८ कोटी उत्पन्न संपर्क क्रांतीला सांगली जिल्ह्याने दिले आहे. आत्तापर्यंत सुमारे १४० कोटी रुपयांचे उत्पन्न सांगली जिल्ह्यातून संपर्क क्रांतीला मिळाले आहे.संपर्क क्रांती सतरा वर्षापूर्वी सुरू झाली. सांगलीकरांना रात्री तीन वाजता मिरजेतून ही गाडी पकडायला अनेक अडचणी येतात. गेल्या पंधरा वर्षांपासून सांगलीकर अविरतपणे संपर्क क्रांतीला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्याला रेल्वे प्रशासन दाद देत नाही. हुबळी व धारवाड या एकाच महापालिका हद्दीतील दोन्ही स्थानकाला संपर्क क्रांतीचा थांबा आहे.पण, सांगलीसाठी वेगळा अन्यायी मापदंड लावून फक्त मिरजेला संपर्क क्रांतीचा थांबा दिला आहे. वास्तविक एकाच महापलिका क्षेत्राच्त रेल्वे गाड्यांना दोन किंवा अधिक थांबे दिले जातात. जेणेकरून प्रवासी स्वतःच्या जवळच्या सोयीस्कर स्थानकावरुन गाडीत चढू-उतरू शकतील. तरीही सांगली व मिरज शहरे जवळ असल्याचे कारण देत सातत्याने अनेक गाड्यांना थांबे नाकारण्यात येत आहेत.
नव्या खासदारांसह आता नवा लढानूतन खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन आता रेल्वे प्रशासनाकडे संपर्क क्रांतिच्या थांब्यासाठी मागणी केली जाणार आहे. प्रसंगी लढाही उभारण्यात येईल, असा इशारा मंचचे साखळकर यांनी दिला आहे.