सांगली : रेल्वेच्या पुणे विभागातर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यात स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सांगलीरेल्वे स्थानकातील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. पर्यावरण, स्वच्छता, कार्यालयीन शिस्त व टापटीप आदी बाबतीत स्थानकाने बाजी मारली.उत्कृष्ट डेपो, स्थानक, बागबगिचा या प्रवर्गातून सांगली स्थानकाची निवड झाली. स्थानक अधीक्षक विवेककुमार पोद्दार यांनी हा बहुमान स्वीकारला. गतवर्षी सांगली स्थानकाच्या बगिच्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली स्थानकात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येते. शिवाय पार्किंग, प्रतीक्षागृहात विविध सुविधा, प्रकाश व्यवस्था, आरक्षण कक्षात प्रवाशांना सुविधा आदी कामेही करण्यात येतात.मालधक्क्यावरही अधिकाधिक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत, त्यामुळे मालवाहतुकीतून उत्पन्नही वाढले आहे. सध्या पुणे-मिरज लोहमार्ग दुहेरीकरणातून नवी इमारत उभारली जात आहे. शिवाय आणखी एक फलाट वाढवण्यात येणार आहे. नवा उड्डाण पूलही उभारला जाईल.
स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम
By संतोष भिसे | Published: May 05, 2023 5:07 PM