सांगली : पुणे रेल्वे विभागात स्वच्छतेसाठी सांगली स्थानक सर्वोत्तम ठरले आहे. प्रवासी सुविधा समितीने गुरुवारी केलेल्या पाहणीअंती स्थानक प्रशासनाला शाबासकी दिली. स्थानकात अधिक प्रकाश व्यवस्था, उड्डाणपूल आदी गरजांच्या नोंदीही घेतल्या.
समितीचे सदस्य जी. उमराणी, छोटूभाई पाटील, कैलास वर्मा यांनी स्थानकाची पाहणी केली. उद्यानात वृक्षारोपण केले. या उद्यानाने संपूर्ण मध्य रेल्वे विभागात सर्वोत्कृष्ट उद्यानाचा पुरस्कार मिळविला आहे, त्याची दखलही समितीने घेतली. स्थानकातील पाणीपुरवठा, तिकीट खिडक्यांची संख्या, तेथील सेवा, प्रतीक्षालयातील सुविधा, प्रवाशांसाठी प्लॅटफार्मवर आसने, इंडिकेटर्स, रुळांची स्वच्छता, उद्घोषणा व्यवस्था आदींची पाहणी केली. स्वच्छतेविषयी सर्वाधिक समाधान व्यक्त केले. स्थानक अधीक्षक विवेककुमार पोद्दार, सहायक अधीक्षक कैलास प्रसाद, सहायक विभागीय व्यवस्थापक ब्रजेश सिंह, वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, आरक्षण पर्यवेक्षक डी. के. सिंग यांनी माहिती दिली.
दरम्यान, स्थानकात आवश्यक असलेल्या सुविधांची शिफारस रेल्वे बोर्ड आणि लोकसभेकडे केली जाणार आहे. पुरेसे ध्वनिक्षेपक नसल्याने प्लॅटफार्मच्या दोन्ही टोकांपर्यंत उद्घोषणांचा आवाज पोहोचत नाही. उड्डाणपुलाची अपुरी रुंदी, प्लॅटफार्म क्रमांक तीनवर अपुरी प्रकाश व्यवस्था आदींच्या नोंदी घेतल्या. प्रथमश्रेणी प्रतीक्षालयात वातानुकूलित सुविधा आवश्यक असल्याचे सांगितले.
स्थानकातीलउड्डाणपुलाची रुंदी वाढणार
स्थानकातील सध्याचा उड्डाणपूल अरुंद आणि अपुरा आहे. पुणे-मिरज लोह मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान येथे नवा पूल उभारला जाईल किंवा सध्याचा रुंद केला जाईल, अशी माहिती पथकाला देण्यात आली.