सांगली : ‘मेरा स्टेशन मेरा अभिमान २०२३’अंतर्गत मोठ्या रेल्वे स्टेशन गटामध्ये महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ व सुंदर रेल्वे स्टेशनचा मान सांगली स्थानकाला मिळाला आहे. छोट्या स्थानकामध्ये सातारा जिल्ह्यातील वाठार स्थानकाने बाजी मारली.मध्य रेल्वे झोनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सांगली रेल्वे स्टेशन हे नेहमी स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून बऱ्याच वेळेला स्वच्छतेमध्ये सांगली स्थानकाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. ही माहिती मध्य रेल्वेच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सांगली रेल्वे स्टेशनची काही छायाचित्रेही झळकविण्यात आली आहेत.दरवर्षी सुमारे १३ लाख प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवरून गाड्यांमध्ये चढ-उतार करतात. पण सांगली रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता दिसली नाही. स्थानक व्यवस्थापक विवेककुमार पोदार यांनी सांगली रेल्वे स्टेशन मध्ये नवनवीन स्वच्छता अभियान व योजना राबवून सांगली स्टेशनला महाराष्ट्रामध्ये अग्रेसर ठेवण्यात योगदान दिले आहे. रेल्वे स्टेशनच्या शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांचेही खूप मोठे योगदान असल्याचे मत नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी व्यक्त केले.
स्थानक व्यवस्थापकांना धन्यवादसांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी सांगली रेल्वे स्टेशनचे मॅनेजर विवेक कुमार पोदार यांचे अभिनंदन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील जे प्रवासी सांगली स्थानकावरुन प्रवास करतात, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. स्थानक स्वच्छतेत त्यांचाही वाटा आहे. स्थानक कर्मचारीही योगदान देत आहेत. सामूहिक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. - उमेश शहा, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप