सांगली : बालकामगार प्रथेविरोधात जनजागृती करावी. तसेच, कृती दलाने विविध आस्थापनांवर धाडी टाकून बालकामगार प्रथा मोडून काढावी. तसेच, याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकांची यादी विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, बालकामगार सल्लागार मंडळ, जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समिती, सांगली जिल्हा असंघटित कामगार कार्यकारी समिती आणि बालकामगार कृती दलाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मोहन सोनार, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपनिरीक्षक समिक्षा पाटील, डॉ. संतोष पाटील, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक सूर्यकांत कांबळे, सरकारी कामगार अधिकारी जानकी भोईटे, अशासकीय सदस्य कुमुद नष्टे, अमृत यादव आदि उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, बालकामगार कृती दलाच्या वतीने नोव्हेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत 7 धाडसत्रे झाली असून 54 संस्थांना भेटी देण्यात आल्या. यावेळी एकही बालकामगार आढळून आला नाही. मे महिन्यात 3 धाडसत्रे झाली आहेत. त्यातही एकही बालकामगार आढळून आला नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र, यापुढेही सतर्क राहून बालकामगार प्रथेविरोधात जनजागृती करावी.
बालकामगार सल्लागार मंडळ आणि कृती दलाच्या सदस्यांनी बालकामगार असणाऱ्या ठिकाणी धाडी टाकाव्यात. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या www.mahakamgar.gov.in या संकेतस्थळावर बालकामगारांबाबत तक्रार देता येते. तसेच, शासनाच्या 022-265729292 किंवा सहाय्यक कामगार आय़ुक्त, सांगलीच्या 0233-2672046 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार देता येते. त्यामुळे ज्या ठिकाणी बालकामगार आढळून येतील, तेथे सतर्क नागरिकांनी तक्रार दाखल करावी, जेणेकरून देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल.अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम आस्थापनांची व बांधकाम कामगारांची नोंदणी होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. स्थापत्य स्वरूपाची कामे होत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महानगरपालिका व अन्य ज्या शासकीय कार्यालयांकडून बांधकाम कामकाज केले जाते, त्या शासकीय कार्यालयांनी आणि उपकर वसुलीचे अधिकार असणारे अधिकारी यांनी त्यांच्याकडील बांधकाम कामगारांची नोंद होण्यासाठी सूचना द्याव्यात.सहाय्यक कामगार आयुक्त मोहन सोनार म्हणाले, बालकामगार प्रथा निर्मूलनाकरिता 31 मे रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांच्यावतीने अंकली येथील वीटभट्टी मालक संघटना व वीटभट्टी कामगार संघटना यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बालकामगार व वेठबिगार कामावर ठेवू नये, यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच, बालकामगार विरोधी सप्ताहामध्ये कार्यालयातील सुविधाकारांनी एकूण 107 आस्थापनांना भेटी देऊन बालकामगार ठेवणार नाही, अशी हमीपत्रे भरून घेऊन जनजागृती केली.यावेळी प्रकल्प संचालक सूर्यकांत कांबळे यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सांगली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विशेष प्रशिक्षण केंद्रांची माहिती दिली. ते म्हणाले, जत, खानापूर, पलूस आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रत्येकी एक आणि मिरज तालुक्यात 4 अशी सांगली जिल्ह्यात एकूण 9 विशेष प्रशिक्षण केंद्रे आहेत.
यामध्ये 117 मुले आणि 108 मुली असे एकूण 225 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षभरात 65 शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. यावेळी शासकीय व अशासकीय सदस्यांनी मौलिक सूचना मांडल्या. जिल्ह्यातील असंघटित कामगार, वेठबिगार मजूर यांना मिळणाऱ्या सुविधांविषयी चर्चा करण्यात आली.