सांगली : जिल्ह्यात ढगांची दाटी काही प्रमाणात हटली असून गेली दोन दिवस ऊन-सावलीचा खेळ रंगला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४ जुलैपर्यंत असेच चित्र राहणार आहे. या काळात काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.
जूनच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने चांगली हजेरी लावली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उघडीप मिळाली. सध्या अंशत: ढगाळ वातावरण आहे. बुधवारी सकाळी ढगांची दाटी झाल्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. सकाळी साडेअकरानंतर ही दाटी कमी झाली आणि ऊन-सावलीचा खेळ रंगला. दिवसभर असेच वातावरण राहिले.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. या काळात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. ५ व ६ जुलै रोजी काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. ढगांची दाटी कमी झाल्याने तापमानात वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात आणखी एक अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमाल तापमान सध्या ३ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.