विकास शहाशिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ‘ॲटलास माॅथ’ शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात शनिवारी दिसले. पतंग (फुलपाखरू) सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी साडेसातपर्यंत येथे पडद्यावर विसावले होते. पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार होता. त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शिराळा येथील व्यावसायिक संजय यादव, राजेंद्र सावंत, सुनंदा सावंत, पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिले. जवळपास अकरा इंच मोठा पतंग होता. याच्या दोन्ही पंखांच्या टोकाला नागाचे तोंड व आकार दिसत होता. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. तशातच येथे नागाचे तोंड असलेले फुलपाखरू आढळल्यामुळे अनेकांनी मोबाइलवर फोटो काढले. नागाचे फुलपाखरू शिराळ्यात आल्याची बातमी शहरात पसरली. त्यामुळे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.काहींनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली, तेव्हा ते दुर्मीळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ॲटलास माॅथ असल्याचे समजले. याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला ॲटलास माॅथ म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट, अळी असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते.या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असते. या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारस मागे ठेवून हे पतंग मरतात. शक्यतो रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारा पतंग निशाचर आहे. क्वचितच दिवसा आढळतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने दिसतात. हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबू वर्गीय झाडांवरच आढळतो.
असा असतो पतंगाचा जीवनक्रममादी एका वेळेस १०० ते २०० अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून आळी बाहेर येते. अळी ३५ ते ४० दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. २१ दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. त्यानंतर अंडी घालून पतंगा मरतो. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मीळ जीव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.