सांगली : प्रजासत्ताक दिनी भाजप आणि कॉंग्रेस आमने-सामने, कॉंग्रेसचा मोर्चा, भाजपची तिरंगा यात्रा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:34 PM2018-01-25T18:34:32+5:302018-01-25T18:43:13+5:30
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस प्रजासत्ताक दिनानिमित्त आमने-सामने येत आहेत. कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चाचे तर भाजपने तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.
सांगली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस प्रजासत्ताक दिनानिमित्त आमने-सामने येत आहेत. कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चाचे तर भाजपने तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
कॉंग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जातीयवादामुळे देशातील आणि राज्यातील वातावरण भीतीयुक्त बनले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्यघटनेला धक्का बसेल, अशी शंका सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.
सांगली जिल्हा व शहर कॉंग्रेसतर्फे २६ जानेवारी रोजी दुपारी अडिच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यास अभिवादन करून हा मोर्चा स्टेशन चौकात येईल. त्याठिकाणी सभेद्वारे या संविधान मोर्चाची सांगता केली जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात गुरुवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये प्रजासत्ताक दिनी तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. प्रसंगी दुचाकी रॅलीही काढण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या यात्रेचे नेतृत्व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीरदादा गाडगीळ आदी नेते करणार आहेत.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सामाजिक एकोपा बाळगणे, सामाजिक न्यायाप्रती वचनबद्धता आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना हाच धर्म मानून कार्यरत राहणे हा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयापासून ही यात्रा निघून सांगलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून स्टेशन चौकात राज्य घटनेच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आ. गाडगीळ यांच्या कार्यालयापासून सुरु होणाºया या यात्रेत सर्व नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वारंवार होतोय सामना
यापूर्वी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी कॉंग्रेसने नोटांचे श्राद्ध आंदोलन घेतले होते. त्याचवेळी भाजपने काळापैसा विरोधी दिन साजरा केला होता. आता पुन्हा दोन्ही पक्ष आमने-सामने येत आहेत.