सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एकूण २0 फेर्यात मतमोजणी होणार असून, एकाचवेळी १४ टेबलांवर ६0 हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी चारशे मिनिटे म्हणजे साडेसहा तासांचा कालावधी लागेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, सांगली लोकसभा मतदार संघात साडेदहा लाख मतदान झाले आहे. तसेच चार हजार ३८८ मते पोस्टाद्वारे आली आहेत. या मतांच्या मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे. लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात १४ टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होईल. मिरज विधानसभेच्या २१ फेर्या, सांगली २१, पलूस-कडेगाव २0, खानापूर २४, तासगाव-कवठेमहांकाळ २१, जत २0 अशा सरासरी २0 फेर्या होतील. एका टेबलावर ७00 ते ८00 मतमोजणी गृहित धरता, एकावेळी ६0 हजार मतांची मोजणी होईल. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही १00 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. मतमोजणीसाठी ६00 कर्मचारी नियुक्त केले आहेत. निकालानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, कायदा मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही कुशवाह यांनी दिला. (प्रतिनिधी) मिरवणुकांवर बंदी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निकालानंतर मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. दुचाकीचे सायलेंसर काढून दुचाकी फिरवून ध्वनिप्रदूषण करणार्यांवर प्रशासनाचा वॉच असेल. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना केल्या आहेत. राजकीय पक्षांनीही मिरवणुकीवरील बंदीला मान्यता दिल्याचे कुशवाह म्हणाले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. केंद्रात शंभर, तर केंद्राबाहेर दीडशे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. सांगली, मिरजेत आठ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. हुल्लडबाजी करणार्यांना जागेवर पकडून चोप दिला जाणार आहे. मतमोजणीसाठी बंदोबस्त |