सांगली : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना गेल्या वीस वर्षांपासून निवृत्तीवेतन वेळेत मिळत नसल्याने निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
यात म्हटले आहे की, महापालिका शाळांमधील निवृत्त शिक्षकांना गेल्या वीस वर्षांपासून पेन्शन वेळेत मिळत नाही. पेन्शनची रक्कम शासन ५0 टक्के आणि महापालिका ६0 टक्के देते.
शासनाकडून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तर महापालिकेकडून ३0 तारखेपर्यंत पेन्शनची रक्कम दिली जाते. त्यामुळे निवृत्त शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पेन्शन मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
प्रॉव्हिडंट फंडाची (भविष्य निर्वाह निधी) रक्कम निवृत्ती दिवशीच मिळावी, पेन्शन विक्री व उपदानाची रक्कमही निवृत्तीच्या महिन्यातच मिळावी, ज्या निवृत्तांचे वय ८0 झाले आहे त्यांना १0 टक्के निवृत्तीवेतन वाढ मिळावी, २00६ ते २00९ या कालावधित निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी व फरक देण्यात यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.मागण्यांचा विचार करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही तर येत्या १७ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलनात समितीचे मिरजेचे कार्याध्यक्ष अशोक थोरात दगडू पाटील, बाहुबली मोगलाडे, सुनिता गडकरी, विठ्ठल राजोपाध्ये, सुभाष माळी, अशोक शिंदे, बापुसो पाटील, शैलजा इनामदार, म. जा. मुतवल्ली आदी सहभागी झाले होते.