सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली.मुंबईत बुधवारी कालवा समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदामंत्री महाजन बोलत होते. या बैठकीस आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार भारत भालके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगोला येथील माजी आमदार दीपकआबा साळुंखे, सांगली पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच उपसा सिंचन योजनांचा आढावा सादर केला. टेंभू योजनेचे वीज बिल २१ कोटी आणि पाणीपट्टी ३५ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे वीज बिल ३४ कोटी आणि पाणीपट्टी ७१ कोटी अशी थकबाकी आहे. यापैकी काहीच वसुली झाली नसल्यामुळे वीज बिल भरणे कठीण झाले आहे.
ताकारी योजनेचे दहा कोटींचे वीज बिल आणि २९ कोटी पाणीपट्टीची थकबाकी आहे. यापैकी ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाच कोटी भरले आहेत. थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु केल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकूण थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय या योजना चालू करता येणार नाहीत, शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करावे.अधिकारीही वसुलीसाठी प्रयत्न करतील. वीज बिलाबरोबरच सिंचन योजना सुरळीत चालू राहण्यासाठी पाणीपट्टीचीही रक्कम नियमितपणे भरली पाहिजे. यासाठीही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
सिंचन योजनांची थकबाकी
योजना वीज बिल पाणीपट्टी
म्हैसाळ ३४ कोटी ७१ कोटी
ताकारी १० कोटी २९ कोटीटेंभू २१ कोटी ३५ कोटीसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत शेतकरीशिवसेनेचे आ. अनिल बाबर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, टंचाई निधीतील १६ कोटी शासनाकडून उपलब्ध करून आणल्याचे मागील आठ दिवसांत सांगितले होते.लोकप्रतिनिधींच्या या घोषणेमुळे, पिकांना तात्काळ टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण, जलसंपदामंत्री महाजन आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय योजना चालू करता येणार नसल्याचे बुधवारी सांगितले.त्यामुळे सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ताकारी योजनेची थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे ती योजना चालू झाली आहे. म्हैसाळ आणि टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शेतकºयांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.