- शरद जाधवसांगली - टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या २१ लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले. ‘कॅपिटालिक्स’ नावाच्या ग्रुपवरून ट्रेडिंग केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत इस्लामपूर येथील एकाचे २१ लाख १० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. याचा शोध घेताना पोलिसांना पावने आठ कोटींची रक्कम गोठविण्यात यश आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वासराव पाटील यांना कॅपिटालिक्स ग्रुपवरून चॅटिंग करून ऑनलाइन ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात आली होती. ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळी २० बाेगस बँक खाती त्यांना देण्यात आली होती. या खात्यावर त्यांनी २१ लाख १० हजार रुपयांची रक्कम पाठविली होती. यानंतर पाटील यांना परतावा मिळण्याची प्रतीक्षा होती. यानंतर संशयितांनी त्यांना गुंतवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी कर म्हणून अजून १० लाख ८५ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील, असे चॅटिंगवरच सांगितले. त्यासाठी आणखी पाच बनावट खाती दिली होती.
या व्यवहाराबाबत पाटील यांना शंका आल्याने त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, संबंधितांची २७ बनावट खाती तपासण्यात आली. यात सर्व खात्यांवर मिळून तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने ही सर्व खाती ‘फ्रीज’ करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली.
सोशल मीडियावर व्यवहार जपून करासध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा पैसे मिळवून देण्याचेही आमिष दाखविण्यात आले आहे. टेलिग्रामवरील ‘कॅपिटालिक्स’सह अन्यही काही ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक झाल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.