सांगली : पॅनकार्ड क्लब्ज् लिमिटेड कंपनीत सांगली जिल्ह्यातील ५ लाख गुंतवणुकदारांचे ३५0 कोटी रुपये अडकले आहेत. तातडीने गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डीनेशन कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कमिटीचे सचिव एम. बी. मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.मोरे म्हणाले की, राज्य व राज्याबाहेरील एकूण ५५ लाख गुंतवणुकदारांचे ८ हजार कोटी रुपये या कंपनीकडे अकडले आहेत. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असा आदेश १५ मे २0१७ रोजी सॅटने दिले होते.
मात्र सेबीकडून सध्या सुरू असलेल्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया संशयास्पद आहे. मिळकतींची किंमत ५0 ते ६0 टक्क्यांनी कमी केली जात आहे. कंपनीच्या सर्व मालमत्ता सिल करण्याचे आदेश असताना ८४ पैकी केवळ २७ मालमत्ताच सिल केल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सर्व पैसे कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून गुंतवणूकदारांना न्याय देणे गरजेचे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आठ दिवसात सेबीकडून अहवाल मागितला होता. या घटनेस आता महिना झाला तरीही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकूणच सर्वच यंत्रणांची चालढकल यामध्ये सुरू आहे.
आमच्या संघटनेने यासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन यापूर्वी केले होते. तरीही शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. कंपनीच्या मालमत्ता या सामान्य गुंतवणूकदारांच्याच आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्यावतीने किमान ६ तज्ज्ञांचा समावेश लिलाव प्रक्रियेत असावा, गुंतवणुकदारांची नावे व त्यांच्या रकमांची यादी तातडीने जाहीर करावी या मागण्या संघटनेने केल्या आहेत.येत्या ३0 जानेवारीस महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाचवेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सांगलीतील धरणे आंदोलनात येथील गुंतवणूकदार, एजंट यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष एम. एल. साळवी, पी. एल. अग्रवाल, ए. एस. खोत, एस. टी. कचरे, आर. टी. सरगर, यु. आर. पाटील, एस. जी. जाधव, एस. बी. पिंजारी, एस. एस. ढवळे उपस्थित होते.