- घनशाम नवाथे सांगली - बंद घरे फोडणारा अट्टल चोरटा सुनील नामदेव रुपनर (वय ३२, रा. कुपवाड, ता. मिरज) आणि त्याच्याकडून दागिने घेणारा सराफ सुशील संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. रूपनरकडून पाच घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. चोरीचा ७ लाख ५२ हजार १०० रुपयांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी, चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक जण सांगली रेल्वे स्थानकाच्या नजीक असणाऱ्या हरिप्रिया अपार्टमेंटसमोर थांबला असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणच्या पथकातील पोलिस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार, दि. २६ रोजी परिसरात सापळा रचला. अपार्टमेंट समोर एक जण संशयास्पद थांबलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता हातोडी, तसेच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली.
दागिन्यांसंदर्भात विचारणा केली असता संशयिताने एसबीआय, अभयनगर, बालाजीनगर, होळकर चौक, विष्णुघाट आणि सहारा चौक या परिसरातील बंद घरे फोडल्याची कबुली दिली. चोरीतील सोने त्याने त्याच्या ओळखीचा सोनार सुशील आपटे यास विक्री केल्याचे सांगितले. पोलिस तपासात संशयित सुशील आपटे यास घरफोडी करणारा सुनील रुपनर हा गुन्हेगार असून तो चोरीतील सोने आणून देत असल्याचे माहीत असूनही तो दागिने खरेदी करत होता.
रूपनर हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर संजयनगर, विश्रामबाग आणि सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून संजयनगर हद्दीतील चार, शहर हद्दीतील एक अशा पाच घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. ७ लाख ५० हजार रुपयांचे सोने, रोख दोन हजार असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, संदीप नलवडे, उदयसिंह माळी, सागर लवटे, अमर नरळे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
वारंवार दागिने खरेदीमुळे अटकसराफ आपटे याचा रूपनर हा मित्र आहे. तो चोरीचे दागिने आणून विक्री करतो हे त्याला माहीत होते. वारंवार दागिने खरेदी करून आपटे नामानिराळाच होता; परंतु गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला अखेर जेरबंद केले.