- अविनाश कोळी
सांगली - ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगली, आष्टा शहर व परिसरातील ऊस वाहतूक अडविली. ट्रॅक्टर व बैलगाड्यांचे टायर फोडल्याने दिवसभर ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर अडकून पडली.
सांगली शहरातील शिवशंभो चौक येथे सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी वाहने अडविली. बैलगाड्यांच्या टायरची हवा सोडली. ऊस दर न देणाऱ्या कारखानदारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी कर्नाळ रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ दत्त इंडियाकडेच जाणारे ट्रॅक्टर अडविले. त्यांची हवा सोडली.
त्यामुळे सांगलीतील ऊस वाहतूक दिवसभर ठप्प झाली. सांगलीप्रमाणे आष्टा शहरातही आंदोलन झाले. कारंदवाडीत राजारामबापू कारखान्याकडे (सर्वोदय) जाणाऱ्या बैलगाड्या व ट्रॅक्टर आष्ट्यात अडविण्यात आले. टायरची हवा सोडून वाहने अडवून ठेवण्यात आली.