सांगली : बाप चोरणाऱ्या टोळ्यांचा महाराष्ट्रात धुडगूस सुरू आहे. भारत ही संकल्पना संपली आहे. अशा स्थितीत गौतमीपुत्र कांबळे यांच्यासारख्या पणत्या जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त रविवारी सांगलीत सपत्नीक सन्मान झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गवस बोलत होते. उद्योगपती सी. आर. सांगलीकर, आमदार अरुण लाड, विजया कांबळे, भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, व्ही. वाय. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. गवस म्हणाले, समाजावरील निष्ठेने काम करणारी माणसे कमी होत आहेत. अविचाराने वागणारे, कोणतीही विचारसरणी नसणारे लोक वाढत आहेत. थापा मारणारी, सत्याला असत्य मानणारी टोळी उच्च पदांवर बसली आहे. सध्याचा काळ संशयाचा, सुमारांचा आहे. चांगले लोक वळचणीला पडले आहेत. लुटारूंच्या टोळ्या आपल्याला जेरबंद करायला टपल्या आहेत. अशा वेळी गौतमीपुत्र यांच्यासारख्या पहारेकऱ्याची गरज आहे. अशा पणत्या जपणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.
राजकारणी, धर्मांध आणि भांडवलदारांची युती तोडासत्काराला उत्तर देताना प्रा. कांबळे म्हणाले, हिंसेपेक्षा तिचे समर्थन घातक असते. पुढील अनेक हिंसांचा तो परवाना असतो. जगभरात धार्मिक युद्धाने थैमान मांडले आहे. भविष्यात सांस्कृतिक मुद्यांवर युद्धे होतील. सगळे धर्म संपले तरी संस्कृती शिल्लक राहील. सगळ्या धर्मांनी आपापली संस्कृती वाटून घेतली आहे.
राजकीय, धार्मिक आणि भांडवलदारांच्या युतीने सर्वसामान्यांच्या आयुष्याची वाट लावली आहे. ही युती आपण तोडली पाहिजे. त्यांचे दुबळे मुद्दे शोधून वार केले पाहिजेत. अराजकता वाढत असली, तरी तिचे स्वागत केले पाहिजे. कारण त्यानंतर समता येते. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संविधान आपल्याकडे आहे. त्यामुळे जगाकडून उसने काही घेण्याची गरज नाही.