लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मारुती व शनी मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड गुरुवारी शनी जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमांपासून दूर राहावे लागले.
रामनवमी, हनुमान जयंतीपाठोपाठ आता शनी जयंतीलाही मंदिरांचे दरवाजे लॉकडाऊनमुळे बंद राहिले. शहरातील पंचमुखी मारुती मंदिर, लक्ष्मीनगर येथील शनी मंदिरातील पुजाऱ्यांनी जयंतीनिमित्त पूजाविधी पार पाडले. पहाटे पाच वाजल्यापासून मंदिरांमध्ये तयारी सुरू होती. गाभारा व मूर्तीला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. रुद्राभिषेक, जन्मकाळ उत्सव, आरती, नैवेद्य अर्पण असे कार्यक्रम पार पडले.
सांगलीच्या पंचमुखी मारुती मंदिरात पहाटेपासून पूजाविधी सुरू होता. मोजक्याच पाच लोकांच्या उपस्थितीत येथील कार्यक्रम पार पडले. शनी जयंतीनिमित्त मंदिर सजविण्यात आले होते. यावेळी बाबूराव पुजारी, अमोल पुजारी, श्रीकांत शिंदे, आदी उपस्थित होते. अमोल पुजारी म्हणाले की, साधेपणाने जयंती साजरी करतानाच आम्ही कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना केली. या संकटामुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, म्हणून प्रार्थना करतानाच सर्व पूजाविधी परंपरेप्रमाणे करण्यात आले.
सलग दोन वर्षांपासून रामनवमी व हनुमान जयंतीचे कार्यक्रम रद्द झाले.