अशोक डोंबाळे
सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आठ दिवसांपूर्वी घेतला आहे. तोपर्यंत चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने प्रसिध्द केला असून त्यानुसार केवळ ५० पदांनाच मंजुरी दिली आहे. उर्वरित शाखा अभियंत्यांसह ७४ पदांना शासनाने कात्री लावल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कामे वाढली असताना पदे कमी कशी झाली, याचीच अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहे.संगणकीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील ३० टक्के पदांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शासनाने सर्व शासकीय कार्यालयांकडून सुधारित आकृतिबंध आराखडा मागविला होता. बहुतांशी कार्यालयांनी सुधारणा करुन आराखडे शासनाकडे सादरही केले आहेत.
टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय आणि उपविभागीय बांधकाम कार्यालये बंद करुन तेथील पदे अन्य ठिकाणी वर्ग करण्याचा निर्णय दि. १० जानेवारी २०१८ रोजी घेतला होता. तोपर्यंत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने टेंभू उपसा सिंचन योजनेकडील पदांनाही कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
टेंभू उपसा सिंचन योजना विभाग क्रमांक एककडे कार्यकारी अभियंता एक, उपकार्यकारी अभियंता एक, उपअभियंता पाच, शाखा अभियंता २४, भांडारपाल एक, सहाय्यक भांडारपाल एक, विभागीय लेखापाल एक, आरेखक व सहाय्यक आरेखक, अनुरेखक सात, कनिष्ठ लिपिक व टंकलेखक २२, वरिष्ठ लिपिक १०, नाईक एक, शिपाई १५, चौकीदार सहा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २०, वाहन चालक सहा अशी १२४ पदे मंजूर होती.
नवीन आकृतिबंधामध्ये कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची पदे पूर्वीप्रमाणे जैसे थे ठेवली आहेत. शाखा अभियंत्यांची चार पदे रद्द केली असून भांडारपाल हे पदच बंद केले आहे. त्याऐवजी एकच सहाय्यक भांडारपाल हे पद ठेवले आहे. आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक अशी एकत्रित सात पदे कार्यरत असून, नवीन आकृतिबंधामध्ये एकच पद ठेवले आहे. उर्वरित सहा पदांना कात्री लावण्यात आली आहे.
कनिष्ठ लिपिक, टंकलेखक यांची २२ पदे कार्यरत असून, सुधारित आकृतिबंधामध्ये चौदा पदे रद्द झाली आहेत. केवळ आठ कर्मचाऱ्यांवरच सर्व कामाचा ताण पडणार आहे. वरिष्ठ लिपिकाचीही सहा पदे रद्द झाली असून, चारच कार्यरत राहणार आहेत.शिपायाच्या १५ पैकी ११ पदांची कपात करुन चारच ठेवली आहेत. चौकीदाराची सहापैकी केवळ दोनच पदे मंजूर आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची सध्या वीस पदे कार्यरत आहेत. नवीन आकृतिबंधामध्ये एकही पद ठेवलेले नाही. वाहन चालकाची सहा पदे कार्यरत होती. भविष्यात एकही पद ठेवलेले नाही. सध्या १२४ पदे कार्यरत असून नवीन आकृतिबंधानुसार ७४ पदे कमी होऊन केवळ ५० पदेच कार्यरत राहणार आहेत.
राज्य शासनाच्या या निर्णयानुसार टेंभू उपसा योजनेकडील कामावर त्याचा परिणाम होणार आहे. आजही टेंभू योजनेकडील ४० टक्के कामे अपूर्ण आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही त्याची कामे करुन घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे, ती खोळंबण्याची शक्यता आहे. लिपिकाची ६० टक्के पदे कपात केल्यामुळे योजनेच्या निविदा प्रक्रिया राबविण्यासह विकास कामे राबविण्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
टेंभू योजनेकडे पदेपद सध्या कार्यरत नवीन आकृतिबंधकार्यकारी अभियंता १ १उपकार्यकारी अभियंता १ १उपअभियंता ५ ५शाखा अभियंता २४ २०भांडारपाल १ ०सहाय्यक भांडारपाल १ १विभागीय लेखापाल १ १आरेखक, अनुरेखक ७ १कनिष्ठ लिपिक, टंकलेखक २२ ८वरिष्ठ लिपिक १० ४नाईक १ १शिपाई १५ ४चौकीदार ६ २स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २० ०वाहनचालक ६ ०एकूण १२४ ५०योजनेची कामे ठप्प होणारटेंभू उपसा सिंचन योजनेकडील कालवे, पोटकालव्यांचा आराखडा करणे, कामावर देखरेख करण्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शाखा अभियंता, आरेखक, अनुरेखक यांची महत्त्वाची जबाबदारी असते. नवीन आकृतिबंधामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची सर्वच २२ पदे, शाखा अभियंत्याची चार आणि आरेखक, अनुरेखकाची सहा पदे रद्द केली आहेत. ही महत्त्वाची पदे रद्द केल्याने, निधी असूनही योजनेची कामे पूर्ण करण्यात मोठा अडथळा येणार आहे. याचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.