सांगली : शिवाजी विद्यापीठाच्यासांगली उपकेंद्रासाठी प्रस्ताव द्या, दोन मिनिटांत मंजुरी देतो, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगलीत सोमवारी विद्यापीठाचे उपकेंद्र या विषयावर परिसंवाद झाला. त्यावेळी ते बोलत होते.लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व विद्यापीठ विकास मंचतर्फे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, अधिसभा सदस्य ॲड. स्वागत परुळेकर, संजय परमणे, नीता केळकर, श्रीनिवास गायकवाड, काव्यश्री नलवडे, विनिता तेलंग, डॉ. मनोज पाटील, आदींनी भाग घेतला.विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मागणीला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, विद्यापीठे स्वायत्त आहेत. कोणताही निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे सांगलीतील उपकेंद्रासाठी प्रस्ताव दिल्यास, तो तत्काळ मंजूर करू. तूर्त भाड्याच्या जागेतही सुरू करता येईल. राज्यातील विविध संस्थांकडे दायित्व निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातून उपकेंद्रासाठी वर्षाकाठी विशिष्ट निधी देता येईल.संजय परमणे म्हणाले, उपकेंद्राला स्वत:ची जागा नसली, तरी ते तूर्त भाड्याच्या जागेत सुरू करता येईल. येत्या जूनमध्येही ते सुरू करता येऊ शकेल. अधिसभा समितीमधून तसा प्रस्ताव देऊ. उपकेंद्रासाठी १०० एकर जागेची आवश्यकता असली, तरी ती नंतर शोधता येईल.श्रीनिवास गायकवाड म्हणाले, सांगलीला उपकेंद्राचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.चंद्रकांत पाटील यांनी मनावर घेतल्यास ते तत्काळ प्रत्यक्षात येऊ शकते. सांगलीसारख्या मध्यवर्ती शहरात ते होणे सर्वांच्या फायद्याचे व सोयीचे ठरेल. चर्चेत धीरज सूर्यवंशी, प्रा. रामराजे माने, प्रा. सिद्धेश्वर जाधव यांनीही भाग घेतला.
एनसीसीची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करूचंद्रकांत पाटील म्हणाले, सैन्यात भरतीसाठी एनसीसी प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. ते वाढविण्याची सार्वत्रिक मागणी आहे; पण हा निर्णय केंद्राच्या अखत्यारित आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय सेवा योजनेची क्षमता तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविली आहे. एनसीसी कोटा वाढविण्यासाठीही प्रयत्न करू.