सांगली : कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले.गेल्या काही वर्षापासून भिडे यांना दोन पोलिसांचे संरक्षण होते. कोरेगाव भीमा घटनेनंतर त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात त्यांच्या सुरक्षेसाठी दहा पोलीस तैनात केले आहेत.
२० एप्रिलला भिडे हे पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने कामानिमित्त पुण्याला गेले होते. ही बाब रात्र ड्युटीवर त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हवालदार ए. के. कोळेकर, टी. बी. कुंभार, एस. ए. पाटील, व्ही. एस. पाटणकर व ए. एस. शेटे यांना समजली नाही.
सकाळ सत्रातील सुरक्षेचे पाच पोलीस ड्युटीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. ही बाब जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना समजताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत पाचही पोलीस भिडे यांच्यासोबत पुण्याला गेले नसल्याची माहिती मिळाली होती.कर्तव्यात कसूरपणा केल्याबद्दल या पाचही पोलिसांना शर्मा यांनी शुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले होते.
भिडे यांना या कारवाईचे वृत्त समजताच त्यांनी तातडीने शर्मा यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला. साहेब, आपण निलंबित केलेल्या पाच पोलिसांचा काहीच दोष नाही. त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती केली.
तसेच मला सुरक्षेची काही गरज नाही. मी कुठेही फिरत असतो, विनाकारण तुमच्या लोकांचे हाल होतात. माझ्या संरक्षणासाठी दिलेले हे पोलिस अन्य कामासाठी घ्यावेत, असेही सांगितले. यावर शर्मा यांनी ही खात्यांतर्गत बाब आहे. आमच्या लोकांची चूक असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली आहे, असे सांगितले.सुरक्षेत पुन्हा नियमिततापाच पोलिसांना निलंबित केल्यानंतर भिडे यांच्या संरक्षणासाठी नव्याने पाच पोलीस तैनात केले आहेत. हे पोलिसही सांगली शहर, विश्रामबाग व पोलीस मुख्यालयातील घेण्यात आले आहेत. सध्या तैनात केलेल्या पोलिसांना भिडे यांच्या संरक्षणात कोणत्याही प्रकाररचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.