सांगली - करंजे (ता. खानापूर) येथे शेतजमिनीवरील दाव्याचा निकालाआधारे सात-बारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. शशिकांत ज्ञानदेव ओमासे (वय ४६, रा. कोल्हापूर रोड, सांगली) असे मंडल अधिकाऱ्याचे नाव असून, याच ठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या विजय शंकर ओमासे (३६) यानेही लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवरही कारवाई केली आहे.
तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीबाबत विटा प्रांत कार्यालय व सांगली येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल होता. याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला आहे. या निकालानुसार सात-बारा उताऱ्यावर वडिलांचे नाव नोंद करण्यासाठी त्यांनी करंजे तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी मंडल अधिकारी शशिकांत ओमासे याने स्वत:करिता व तलाठी विजय ओमासे याच्याकरिता पाच हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
‘लाचलुचपत’ ने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार मंगळवारी करंजे येथे सापळा लावला असता, शशिकांत ओमासे याने तीन हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तलाठी विजय आमासे यानेही यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांनाही लाचलुचपत च्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांवरही विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रीतम चौगुले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.