दत्ता पाटीलतासगाव : निवडणुकीच्या रणांगणात बॅकफुटवर राहणाऱ्या खासदारांनी, काही वर्षात सत्तेचे सिंहासन मिळवण्यासाठी ‘दे धक्का’ स्टाईल अवलंबली होती. त्यामुळे खासदारांच्या विरोधातच राहण्याचा इरादा तासगाव-कवठेमंकाळ तालुक्यातील आमदार आणि सरकार गटाने केल्याचे दिसून येत आहे. सांगली व तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत हे दोन्ही गट खासदारांच्या विरोधात राहतील, अशी चर्चा आहे. ‘आमदार, सरकारांचा इरादा पक्का, नको खासदारांचा दे धक्का’ असेच चित्र दिसून येत आहे.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील गट विरुद्ध आर. आर. पाटील गट अशीच पारंपरिक लढत होत राहिली. दुसरीकडे माजी मंत्री अजितराव घोरपडे कधी खासदार गटासोबत, तर कधी आमदार गटासोबत राहिले. मात्र खासदार गटासोबत राहिल्यानंतर सरकारांच्या पदरात मतांपेक्षा ‘दे धक्का’चे अनुभवच जास्त आले.गेल्या काही निवडणुकांत काही प्रमाणात खासदार गट बॅकफुटवर राहिला. मात्र सत्तेचे सिंहासन ताब्यात घेण्यात खासदार गट नेहमीच दोन पावले पुढे राहिला आहे. सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यासाठी खासदारांचे ‘दे धक्का’ तंत्र चर्चेत राहिले आहे. खासदारांच्या धक्क्यामुळे सरकार आणि आमदार गटाचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. निवडणुकीत निवडून आणणे सोपे असले तरी खासदारांच्या धक्का स्टाईलमुळे निवडून आलेले पदाधिकारी टिकवून ठेवणे, हेच आव्हान आमदार आणि सरकार गटांसमोर राहिले आहे.सांगली आणि तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार पाटील जिकडे असतील, त्यांच्या विरोधात राहण्याबाबत घोरपडे आणि आर. आर. पाटील यांच्या गटाची एकवाक्यता झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन्ही गट एकत्रित लढताना दिसून येण्याची शक्यता आहे.बाजार समिती निवडणूक हा ‘ट्रेलर’चकृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ‘ट्रेलर’ असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आमदार आणि सरकार गटांनी खासदारांच्या विरोधातच राहण्याचा इरादा पक्का केल्याचे दिसून येत आहे.
सांगली-तासगाव बाजार समिती निवडणूक: आमदार, सरकारांचा सूर... खासदारांना ठेवू दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:18 PM